पुणे : प्रतिनिधी
आगामी काळातील अखिल भारतीय साहित्य संमेलने ही अधिकाधिक लोकाभिमुख होण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचे असून त्यासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या माजी संमेलनाध्यक्षांनी केली. निमित्त होते, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या कार्यालयाच्या उद्घाटनाचे. या निमित्ताने माजी संमेलनाध्यक्ष राजेंद्र बनहट्टी, डॉ. सदानंद मोरे, डॉ. अरुणा ढेरे, लक्ष्मीकांत देशमुख, भारत सासणे या संमेलनाध्यक्षांच्या उपस्थितीत हे उद्घाटन झाले. या वेळी व्यासपीठावर महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कार्यवाह सुनिताराजे पवार व कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी उपस्थित होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये पुढील तीन वर्षांसाठी हे महामंडळाचे कार्यालय आता कार्यरत असणार आहे.
बनहट्टी म्हणाले, १९८८ ते १९९२ या काळात पुण्यामध्ये महामंडळाचे कार्यालय होते तेव्हा मी अध्यक्ष होतो. त्यावेळी मराठी वाङ्मयाच्या अभिवृद्धीसाठी अक्षर वाङ्मय योजना आणण्याचा आमचा प्रयत्न होता. त्यामध्ये १०० उत्कृष्ट पुस्तके अवघ्या एक हजार रुपयांत द्यायची योजना होती. मात्र ती योजना धूळ खात पडली. आता महामंडळाने अशीच एक नवी योजना नूतनीकरण करून आणावी आणि वाचकांना त्याचा लाभ मिळवून द्यावा.
डॉ. मोरे म्हणाले, साहित्य संमेलनाच्या रुपाने साहित्याचा उत्सव जरुर व्हावा परंतु काही ठोससुद्धा व्हावे अशी अपेक्षा आहे. सध्याच्या काळामध्ये भाषेवर आक्रमण करणारे एक नवे आव्हान कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआयच्या रुपाने आलेले आहे. सगळ्याच भाषांना या एआयचा सामना करावा लागणार आहे. कारण हे तंत्रज्ञान जगण्याला व्यापून टाकणार आहे. त्यामुळे त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. माजी संमलेनाध्यक्ष श्रीपाल सबनीस हे प्रकृतीअस्वास्थ्यामुळे येऊ न शकल्याने त्यांनी लिहून शुभेच्छा पाठवल्या.प्रास्ताविक सुनिताराजे पवार यांनी तर विनोद कुलकर्णी यांनी आभार मानले
संमेलन सर्वसमावेशक करणार: प्रा. मिलिंद जोशी
अध्यक्षीय समारोप करताना प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, महामंडळाच्या कार्यालयाचे उद्घाटन अन्य कोणाच्याही हस्ते करता आले असते परंतु सर्व संमेलनाध्यक्ष हे साहित्यविश्वाचे ब्रँड एम्बेसिडर आहेत म्हणून त्यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले आहे.