नांदेड : नांदेडमध्ये एक भयंकर घटना समोर आली आहे. उपसरपंचानेच १६ वर्षांच्या अल्पवयीन तरुणीवर बलात्कार केला आहे. या घटनेनंतर अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली होती. या घटनेने परिसरात एकच संताप व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी आरोपी उपसरपंचाला ताब्यात घेतले असून पुढील तपास करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीचे वय १६ वर्षे असून आरोपीचे वय ५५ वर्षे आहे. आरोपी हा उपसरपंच आहे. आरोपीने लैंगिक अत्याचार केल्यानंतर तरुणी गर्भवती राहिली होती. त्यानंतर तिने नऊ महिन्यांनी मुलीला जन्म दिला. मुलीच्या जन्मानंतर आरोपीने ते बाळ विकल्याचा संशय आहे. तामसा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ही घटना असून पोलिस त्या दिशेने तपास करत आहेत.
आरोपी बाबूराव तुपेकर याने वर्षभरापूर्वी गावातीलच एका अल्पवयीन मुलीला गुंगीच्या गोळ्या खाऊ घालून लैंगिक अत्याचार केला. मुलगी गर्भवती राहिली आणि महिनाभरापूर्वी तिची प्रसूती करण्यात आली. पीडित मुलीने जन्म दिलेल्या बाळाला विकल्याचा संशय आहे. हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाला. या प्रकरणी तामसा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी उपसरपंच बाबूराव तुपेकर याला अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलिस करत आहेत.