पुणे : राज्यात तापमानात वाढ होताना पाहायला मिळत आहे. उकाड्याने नागरिक हैराण झाले असून काही ठिकाणी पाणीकपात करण्यात येत आहे. तर काही ठिकाणी पाणी येतच नाही. अनेक ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
यातच आता या वाढत्या उष्णतेत महागाईच्या झळा बसणार आहेत. पाण्याच्या टँकरच्या दरात पाच टक्के वाढ करण्यात आली आहे. पुणे महापालिकेने हा निर्णय घेतला आहे. नागरिकांकडून टँकरच्या मागणीत वाढ होत आहे. टँकरचालकांकडून पाण्याची मागणी करणा-या नागरिकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागण्याची शक्यता आहे.
तसेच मे महिन्यात या मागणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर आता पुणे महापालिकेने हा निर्णय घेतला आहे. खासगी टँकरचालकांना ६६६ रुपयांना मिळणारा १० हजार लिटरचा टँकर आता महापालिकेकडून ६९९ रुपयांना दिला जाणार असल्याची माहिती मिळत आहे.