29.6 C
Latur
Sunday, May 25, 2025
Homeमहाराष्ट्रधनंजय मुंडे नारळी सप्ताहात येणार नाहीत !

धनंजय मुंडे नारळी सप्ताहात येणार नाहीत !

बीड : माजी मंत्री धनंजय मुंडे हे बीड जिल्ह्यातील शिरुर कासारÞ येथील संत श्री भगवानबाबा यांच्या परंपरेतील नारळी सप्ताहाला यंदा येणार नाहीत. या संदर्भात त्यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत न येण्याचे कारणही स्पष्ट केले आहे. नारळी सप्ताहाला बीड जिल्ह्यात मोठे महत्व आहे. धनंजय मुंडे या सप्ताहाला आवर्जून हजेरी लावत असतात. मात्र यावेळी ते येणार नाहीत, त्यांच्या न येण्यामागे तांत्रिक कारण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

धनंजय मुंडे यांनी या संदर्भात केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, मी पिंपळनेर (ता. शिरूर कासार) येथील संत श्री भगवानबाबा यांच्या परंपरेतील नारळी सप्ताहात येण्यासाठी सकाळी साधारण दहा वाजल्यापासून मुंबई येथील पवन हंस विमानतळावर आहे. मात्र काही तांत्रिक कारणांनी अजूनही उड्डाण करण्यास परवानगी मिळत नसल्याने माझा आजचा पिंपळनेर (शिरूर कासार) दौरा जड अंत:करणाने रद्द करावा लागतो आहे.

अध्यात्मिक कार्यक्रमास आपल्यामुळे विलंब नको म्हणून याबाबत आदरणीय शास्त्री बाबांना कल्पना दिली असल्याचे मुंडे यांनी म्हटले आहे. तसेच धनंजय मुंडे यांनी श्री क्षेत्र भगवानगड, आदरणीय महंत न्यायाचार्य ह.भ.प. डॉ. नामदेव महाराज शास्त्री तसेच समस्त पिंपळनेर वासियांची हृदहपूर्वक क्षमाही मागितली आहे. विशेष म्हणजे पाच तासापुर्वीच मुंडे यांनी आपण आज दुपारी १२ वाजता पिंपळनेर ता. शिरूर कासार येथे भगवानगडाच्या नारळी सप्ताहाच्या सांगता सोहळ्यात आशीर्वाद घ्यायला येत असल्याची पोस्ट केली होती.

मंत्री पद गमावल्यानंतर पहिल्याच नारळी सप्ताहात धनंजय मुंडे यांच्या गैरहजेरीने उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. यापुर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या बीड येथील बैठकीला धनंजय मुंडे गैरहजर राहिले होते. आपल्या या गैरहजेरीचा कोणी चुकीचा अर्थ लावू नये, म्हणून त्यांनी त्यामागचे कारणही सामाज माध्यावर पोस्ट व्हायरल करत दिले होते.
डोळ्यावरील उपचारासाठी डॉक्टरांकडे जात असल्याने बीडला येऊ शकणार नाही, असे धनंजय मुंडे यांनी सांगितले होते. परंतु बीडमधील अजित पवारांच्या बैठकीकडे पाठ फिरवणारे धनंजय मुंडे आपल्या मुलीच्या फॅशन शो स्पर्धेला मात्र आवर्जून उपस्थित होते. या कार्यक्रमातील त्यांच्या सहभागाचे कुटुंबासोबतचे फोटो समोर आल्यानंतर त्यांच्यावर टीकाही झाली होती.

आता पिंपळनेर येथील संत श्री भगवानबाबा यांच्या परंपरेतील नारळी सप्ताहात धनंजय मुंडे यांची गैरहजेरी पून्हा चर्चेचा विषय ठरत आहे. धनंजय मुंडे यांनी याचे कारण स्पष्ट केले असले तरी ते पटणार का? हा खरा प्रश्न आहे. विमान उड्डाणास परवानगी मिळत नसल्यामुळे आपण दौरा रद्द करत असल्याचे मुंडे यांनी स्पष्ट केले आहे. आता ते येणार नाही हे निश्चित झाले असून त्यांच्या गैरहजेरीची चर्चा मात्र सुरूच राहणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR