लातूर : बीड आणि लातूर जिल्ह्यातील शेतक-यांचा शक्तिपीठ महामार्गाला विरोध कायम असून महामार्गाच्या मोजणीसाठी आलेल्या अधिका-यांना आल्या पाऊली परत फिरावे लागले. एकच जिद्द शक्तिपीठ रद्द अशी जोरदार घोषणाबाजी करत गावकरी एकवटले. त्यामुळे मोजणीसाठी आलेली पथके परत फिरली.
लातूर आणि बीड जिल्ह्यातील अनेक गावातून शक्तिपीठ महामार्गाला तीव्र विरोध होताना दिसत आहे. फडणवीस सरकारचा महत्वाकांक्षी उपक्रम म्हणून शक्तिपीठ महामार्गाकडे पाहिले जात आहे. मात्र यास अनेक ठिकाणी विरोध होत आहे. लातूर जिल्ह्यातील चाडगाव येथे मोजणीसाठी महसूल विभागातील अधिकारी आणि काही कर्मचारी तसेच ज्या कंपनीस काम देण्यात आले आहे. त्याचे कर्मचारी आले होते. त्यावेळी चाडगाव येथे आजूबाजूच्या आठ गावातील शेतकरी हजर झाले होते. अधिकारी गावात आल्याबरोबर जोरदार घोषणाबाजी सुरू करण्यात आली. त्यामुळे अधिकारी आल्या पावली वापस गेले.
विरोध करण्यासाठी हजर राहणारे गावे लातूर आणि बीड जिल्ह्यातील चडगाव, मोरवड, नांदगाव, सायगाव , भारज, भोकरंबा, दिघोळ देशमुख, रामेश्वर ही आहेत. या भागातील शेतकरी आपल्या मागणीवर ठाम आहेत. शक्तिपीठ महामार्ग होऊ देणार नाही. यासाठी शेवटपर्यंत आम्ही प्रयत्न करणार, कोणत्याही यंत्रणेला गावात येऊ देणार नाही अशी भूमिका गावक-यांनी घेतली.
३५ गावांतून जाणार ८७ किलोमीटरचा मार्ग
शक्तिपीठ महामार्ग बीड जिल्ह्यातील परळी, अंबाजोगाई तसेच लातूर जिल्ह्यातील रेणापूर, लातूर आणि औसा या एकूण पाच तालुक्यातून जाणार आहे. बीड जिल्ह्यातून ४६ किलोमीटर, तर लातूर जिल्ह्यातून ४१ किलोमीटर हा मार्ग असेल. दोन्ही जिल्ह्यातील पाचही तालुक्यातील जवळपास ३५ गाव शिवारातून हा मार्ग जाणार आहे. बीड आणि लातूर जिल्ह्यातून जाणा-या सुमारे ८७ किलोमीटरच्या शक्तिपीठ मार्गासाठी सुमारे ८५० हेक्टर पेक्षा जास्त जमीन अधिग्रहीत करावी लागणार आहे. याच कारणामुळे मोठ्या संख्येने बाधित लोक एकत्रित येऊन विरोध करीत आहेत.