पुणे : प्रतिनिधी
चाफेकर बंधुंच्या बलिदानातून देशात क्रांतिकारकांची मोठी फळी उभी राहिली. मात्र आज बोटावर मोजण्याइतकेच क्रांतिकारक परिचित आहेत, अशी खंत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.
क्रांतिवीर चाफेकर बंधुंच्या वाड्यातील संग्रहालयाचे लोकार्पण आणि राष्ट्रीय संग्रहालयाच्या दुस-या टप्प्याच्या भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री जयकुमार रावळ, विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार शंकर जगताप, आमदार महेश लांडगे, आमदार उमाताई खापरे, आमदार अमित गोरखे, आमदार प्रशांत बंब, माजी खासदार अमर साबळे, माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे, क्रांतिवीर चाफेकर स्मारक समितीचे अध्यक्ष गिरीश प्रभुणे, महापालिका आयुक्त शेखर सिंह आदी उपस्थित होते.
चाफेकर बंधुंनी क्रांतिकार्याबरोबरच समाजसुधारणांचेही कार्य केल्याचे गौरवपुर्ण उद्गार मुख्यमंत्री फडणवीस यांनी काढले. ते म्हणाले, स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणा-या क्रांतिकारकांचा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहचायला हवा. त्यासाठी चाफेकर स्मारकाला विद्यार्थ्यांच्या भेटी आयोजित केल्या तर संस्कार होतील.
चाफेकर बंधुंचे स्मारक हे अप्रतिम आणि प्रेरणा देणारे असल्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले. ते म्हणाले, स्वातंत्र्यवीरांच्या त्याग, बलिदान आणि समर्पणातूनच देश घडला आहे. त्यातूनच देशाची एकता, अखंडता आणि सार्वभौमत्व कायम आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गिरीश प्रभुणे यांनी केले.