सोलापूर : शिवसेना शिंदे गटाचे राज्यातील कॅबिनेट मंत्री भरत गोगावले हे आज सोलापूर दौऱ्यावर होते. तेव्हा त्यांच्या समोरच शिंदे गटाच्या दोन पदाधिकाऱ्यांमध्ये वादावादी झाली.
मंत्री भरत गोगावले हे दुपारी साडेबारा वाजता जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांच्या सात रस्ता येथे असलेल्या कार्यालयात आले होते. तेथे त्यांचा मनीष काळजे यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. दरम्यान शिंदे गटाचे अन्य पदाधिकारी डाक बंगल्यावर गोगावले यांची वाट पाहत होते. मात्र त्यांना डाक बंगल्यावर येण्यासाठी फार उशीर होत असल्याने त्यांचा संयम तुटला. त्यानंतर माजी शहर प्रमुख मनोज शेजवाळ यांनी मनीष काळजे यांच्या कार्यालयात जाऊन मनीष काळजे व त्यांच्या कार्यकर्त्यांना उशीर का होत आहे अशी विचारणा केली.
तेव्हा त्यांनी दौरा वेळेनुसारच होत आहे असे त्यांना सांगितले. मात्र हा मुद्दा काही मनोज शेजवळ व त्यांच्या कार्यकर्त्यांना पटला नाही. त्यांच्यात वादावादी सुरू झाली. बाहेर सुरू झालेल्या वादावादीनंतर मंत्री गोगावले हे सुद्धा त्या ठिकाणी आले. मात्र कार्यकर्त्यांनी त्यांनाही न जुमानता एकमेकांशी वादावादी- बाचाबाची सुरू केली. हा सर्व वाद व बाचाबाची सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाला आहे. एकूणच शिंदे गटातील सोलापूर शहरातील पदाधिकाऱ्यांमध्ये गटबाजीचे प्रदर्शन झाले.
प्रकार गैरसमजुतीतून घडला : शेजवाळ
सोलापुरात मंत्री भरत उगवले दौऱ्यावर आले असताना शिवसेना शिंदे गटाच्या दोन पदाधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची घराची बातमी पुढे आल्यानंतर मनोज शेजवाळ यांनी हा प्रकार गैरसमजुतीतून झाल्याचे सांगितले.
बाचाबाचीची बातमी वृत्तवाहिन्यांवरून सगळीकडे प्रसारित झाल्यानंतर मनोज शेजवाल यांनी तातडीने खुलासा केला. आज झालेला प्रकार हा गैरसमजूतीमधून झाला. कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. मात्र तो विषय मिटला अशी सारवासारव केली.
दुसरीकडे मनीष काळजे यांनी वेगळी भूमिका मांडली. मंत्री गोगावले यांच्या दौरा नियोजित पद्धतीने चालू होता. ते कार्यकर्त्यांच्या व नागरिकांच्या समस्या जाणून घेत होते. मात्र तथाकथित काही नेत्यांनी यामध्ये गालबोट लावण्याचा प्रकार केला. दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याने मंत्र्यासमोरच अरेरावीची भाषा केली. आम्ही हा प्रकार पक्षातील वरिष्ठ नेत्यांना सांगितला असल्याचे प्रसार माध्यमांना सांगितले.
गोगावलेंची दोन्ही नेत्यांना समज?
दरम्यान सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या बाचाबाची प्रकरणानंतर मंत्री भरत गोगावले यांनी दोन्ही नेत्यांना चांगली समज दिल्याचे समजते आहे. त्यानंतरच दोन्ही नेत्यांकडून वादावर पडदा टाकण्याचा प्रकार केला गेल्याचे समजते आहे