खान युनूस : वृत्तसंस्था
इस्रायलने गाझामध्ये पुन्हा एकदा हल्ले सुरु केले आहेत. गेल्या ४८ तासांत इस्रायलने गाझामध्ये केलेल्या हल्ल्यांत १०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, असे गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने शनिवारी सांगितले. इस्रायलच्या सैन्याने हमासवर ओलिसांच्या सुटकेसाठी आणि नि:शस्त्रीकरण करण्यासाठी दबाव आणला आहे. यामुळे त्यांनी गाझावरील हल्ले वाढवले आहेत.
रुग्णालयातील कर्मचा-यांच्या माहितीनुसार, मृतांमध्ये रात्रीच्या वेळी मारले गेलेल्या १५ लोकांचा समावेश आहे. यात महिला आणि मुले आहेत, त्यापैकी काही जणांनी निश्चित केलेल्या मानवतावादी क्षेत्रात आश्रय घेतला होता. दक्षिणेकडील खान युनूस शहरात किमान ११ जणांचा मृत्यू झाला आहे. यातील अनेक जण म्वासी भागातील एका तंबूत रहात होते. येथे लाखो विस्थापित लोक राहत आहेत, असे रुग्णालयातील कर्मचा-यांनी सांगितले. इस्रायलने हा भाग मानवतावादी झोन म्हणून घोषित केला आहे.
युरोपियन हॉस्पिटलने दिलेल्या माहितीनुसार, रफाह शहरात विविध ठिकाणी झालेल्या हल्ल्यांमध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे. यात एक महिला आणि तिच्या मुलीचा समावेश आहे. या सर्वांचे मृतदेह युरोपियन हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले आहेत.
इस्रायलने गाझामध्ये हल्ले तीव्र करण्याची आणि गाझा पट्टीतील मोठे सुरक्षा क्षेत्र ताब्यात घेण्याचे ठरवले आहे. गेल्या सहा आठवड्यांपासून इस्रायलने गाझाची नाकाबंदी केली आहे. त्यांनी गाझामध्ये अन्न आणि इतर वस्तूंच्या प्रवेशावर बंदी घातली आहे.