बोलोम्बा : वृत्तसंस्था
कांगो नदीत झालेल्या बोट दुर्घटनने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. आतापर्यंत १४८ जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक प्रवासी अजूनही बेपत्ता आहेत. कांगो नदी ही आफ्रिका खंडातील दुसरी सर्वात मोठी नदी आहे. ही नदी मध्य आफ्रिकेतून वाहते आणि तिचा बहुतांश भाग कांगोमध्ये आहे. प्रवाशांनी भरलेल्या बोटीला भीषण आग लागली.
आग लागल्यानंतर बोट काही मिनिटांतच उलटली. ही बोट मतानकुमु बंदरातून निघाली होती आणि बोलोम्बाकडे जात होती. बोटीत सुमारे ५०० लोक होते. आग पसरताच एकच खळबळ उडाली आणि अनेक लोकांनी आपला जीव वाचवण्यासाठी नदीत उड्या मारायला सुरुवात केली. धक्कादायक बाब म्हणजे त्यापैकी अनेकांना पोहता येत नव्हतं, ज्यामुळे जास्त लोकांचा बुडून मृत्यू झाला. इक्वेटर प्रांताचे खासदार जीन-पॉल बोकेत्सु बोफिली म्हणाले की, जवळपास १५० लोक गंभीर भाजले आहेत परंतु त्यांना अद्याप कोणतीही वैद्यकीय मदत मिळालेली नाही.
जखमी प्रवासी उपचारासाठी रुग्णालयात दाखल
गंभीर जखमी प्रवाशांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. कांगोसारख्या देशांमध्ये वाहतूक व्यवस्था वाईट आहे, त्यामुळेच तिथे नदीतून प्रवास करणं हे अधिक सामान्य आहे, परंतु बोटींची खराब स्थिती, जास्त गर्दी आणि सुरक्षा नियमांचं पालन न करणं यामुळे अनेकदा अशा दुर्घटना घडतात. गेल्या काही वर्षांत अशा अनेक दुर्घटना झाल्या आहेत ज्यात शेकडो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.