लातूर : प्रतिनिधी
यावर्षी नॅशनल टेस्टींग एजन्सी (एनटीए) द्वारे घेण्यात आलेल्या जेईई-मेन-२०२५ परीक्षेचा निकाल दि. १९ एप्रिल रोजी जाहीर झाला. या परीक्षेत येथील राजर्षी शाहू ज्युनिअर सायन्स कॉलेज मधील विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश संपादन केले आहे. महाविद्यालयातील एकूण ४२५ (पीसीएम ग्रुपच्या २७६ व पीसीबी ग्रुपच्या १५०) विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली.
यापैकी २४ विद्यार्थ्यांनी ९९ पर्सेंटाईलपेक्षा अधिक गुण प्राप्त केले आहेत. आजपर्यंतच्या शाहू महाविद्यालयातील एकाच वर्षी ९९ पर्सेंटाईल गुण प्राप्त करणा-या विद्यार्थी संख्येचा उच्चांक प्रस्थापित केला. महाविद्यालयातील शिवोहम् प्रतापसिंह शिंदे हा विद्यार्थी (९९.९०८७४८३) इतके पर्सेंटाईल गुण घेऊन सर्वप्रथम आला आहे. सुशांत सुधाकर होळकर हा विद्यार्थी (९९.९०३४५१०) गुण मिळवून महाविद्यालयातून द्वितीय आणि ओ.बी.सी. संवर्गातून प्रथम, रोनक निरंजन अग्रवाल (९९.८८८४३८२) गुण मिळवून महाविद्यालयात तृतीय आणि ई.डब्ल्यु.एस. गटातून प्रथम क्रमांकावर आहे. ईश्वरी लक्ष्मणराव अंबुरे (९९.४२८३०२२) मुलीत महाविद्यालयातून प्रथम आली आहे. यश बालाजी कौलासकर (९७.५३२९११) अनुसूचित जाती संवर्गातून आणि ऋषिकेश लिंगरम लगडापोड (९५.३०८६९२९) पर्सेंटाईल गुणासह अनुसूचित जमाती संवर्गातून प्रथम आला आहे.
विषयनिहाय भौतिकशास्त्र विषयात युवराज बुधवंत, पुष्कर वायाळ, दर्शन मुळे, राजवर्धन पाटील व इम्रान शेख हे पाच विद्यार्थी व रसायनशास्त्र विषयात कन्हैया गुट्टे हा विद्यार्थी १०० पर्सेंटाईल गुण मिळवून देशात प्रथम आलेले आहेत. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शिव छत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. गोपाळराव पाटील, उपाध्यक्ष डॉ. पी. आर. देशमुख, सचिव प्राचार्य अनिरुद्ध जाधव, सहसचिव गोपाळ शिंदे, सहसचिव सुनिल सोनवणे व इतर सर्व संचालक, सीईटी-सेल शालेय समिती अध्यक्ष डॉ. सुहास गोरे तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे, सीईटी-सेलचे संचालक प्रा. दिलीप देशमुख, मुख्य-समन्वयक प्रा. स्वप्निल राजेमाने व आयआयटी बॅचचे समन्वयक प्रा. अभयसिंह देशमुख, इतर सर्व समन्वयक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विशेष अभिनंदन केले आहे.