नागपूर : प्रतिनिधी
नागपूर विभागातील शिक्षक नोकर भरती घोटाळ्यात विभागीय उपसंचालक उल्हास नरड यांच्यासह शाळा संचालक, एका मुख्याध्यापकाला अटक करण्यात आली आहे. आमदार संदीप जोशी आणि प्रवीण दटके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या घोटाळ्याच्या एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी असताना काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी या संपूर्ण प्रकरणामागे भाजपच्या एका आमदाराचा हात आहे आणि तो नागपूरचा असल्याचा आरोप करून खळबळ उडवून दिली.
भाजपच्या आमदाराला त्याचा माणूस संचालक पदावर बसवायचा आहे. यासाठी नरड यांचा बळी घेतला जात आहे. नरड यासाठी पात्र आहेत. ओबीसी असल्याने नरड यांना डावलायचे आहे. यासाठी त्यांच्या विरोधात कटकारस्थान रचण्यात आले आहे. ज्या आमदाराने हे कारस्थान रचले आहे त्याचे नाव लवकरच जाहीर करणार आहोत. माझ्याकडे पुरावे येत आहेत. ते येताच त्याचे नाव उघड करणार असल्याचा इशाराही वडेट्टीवारांनी दिली. त्यामुळे आता शिक्षण विभागातील घोटाळ्यावरून वडेट्टीवार विरुद्ध भाजपच आमदारांमध्ये वाद पेटणार असल्याचे दिसून येते.
शालार्थ आयडीचा वापर करून शिक्षकांची भरती झाली आहे. या घोटाळा तपासण्यासाठी चौकशी समिती स्थापन केली होती. नरड हे चौकशी समितीचे अध्यक्ष होते. चौकशी करताना त्यांना संबंधित आमदाराचे लोक त्यामध्ये सापडले आहेत. सुमारे पाचशे शिक्षकांची भरती संशयास्पद आहे. सत्ताधा-यांच्या संस्थांमध्ये झालेल्या बोगस भरती उघडकीस येऊ नये आणि त्यांच्यावर कारवाई होऊ नये यासाठी नरड यांच्याच विरुद्ध तक्रारी करून त्यांना अटक करण्यात आली आहे.
हा प्रकार चोर सोडून संन्याशाला फाशी देणार असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले. ही सर्व बोगस भरती २०१९ ते २०२३ या काळात झाली आहे. त्यानंतर उपसंचालक पदावर नरड नियुक्त झाले आहे. सबंध नसताना नरड यांच्यावर कारवाई केली जात असल्याने यात काहीतरी गडबड असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. फक्त एका आमदाराच्या हट्टापायी पोलिसांच्या कारवाया सुरू असल्याचेही वडेट्टीवार यांनी सांगितले.