लोणावळा : प्रतिनिधी
जुन्या मुंबई-पुणेमहामार्गावरील बोरघाट परिसरातील तीव्र उतारावर नियंत्रण सुटलेल्या ट्रकने रविवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास पाच वाहनांना जोरदार धडक दिली. त्यात कारमधील बाप-लेकीसह तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून, १४ जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
लोणावळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर पांडुरंग इंगुळकर (रा. पुणे) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. ट्रक मुंबईच्या दिशेने जात असताना खंडाळा घाटातील उतारावर ब्रेक फेल झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे ट्रकने समोरून येणा-या पाच वाहनांना जोरदार धडक दिली. त्यात प्रिया सागर इंगुळकर (वय ३५, पुणे), निलेश संजय लगड (वय ४२ वर्षे), श्राव्या निलेश लगड (वय १२ वर्षे, दोन्ही रा. सदशिवपेठ, पुणे) यांचा जागीच मृत्यू झाला.
मुंबई पुणे महामार्गावर रविवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास खंडाळा बॅटरी हिल या ठिकाणी भरधाव वेगातील ट्रक हा पुण्याहून मुंबईच्या दिशेने जात होता. ट्रकने समोरील इनोव्हाला धडक दिली. त्या धडकेमुळे इनोव्हा गाडी समोरून येणारी एर्टिगाला जाऊन धडकली. या भीषण अपघातामध्ये १४ जण किरकोळ जखमी झाले आहेत.
ट्रक चालक घटनास्थळावरून फरार
अपघाताची माहिती मिळताच लोणावळा पोलिस, बोरघाट वाहतूक पोलीस व स्थानिक आपत्कालीन बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला असून, लोणावळा पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.