झारखंडमध्ये कारवाई, नक्षली चळवळीचा म्होरक्या विवेक ठार
धनबाद : वृत्तसंस्था
झारखंड राज्यातील बोकारो जिल्ह्यातील लुगू पहाडी प्रदेशात सुरक्षारक्षक आणि नक्षलवाद्यांच्या चकमकीत ८ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला. त्यामध्ये नक्षली चळवळीचा म्होरक्या आणि १ कोटी रुपयांचे पारितोषिक असलेल्या भाकपा माओवादी केंद्रीय कमिटीचा सदस्य मांझी उर्फ विवेक दा याचाही खात्मा करण्यात आला. मांझीला ठार केल्याने नक्षलवादी चळवळीच्या एका युगाचा अंत झाल्याचे बोलले जात आहे.
नक्षलवाद्यांसंदर्भात रविवारी रात्री पोलिसांना खब-याकडून माहिती मिळाली होती. त्यानुसार सुरक्षा जवानांनी संबंधित परिसरात कोंम्बिंग ऑपरेशन राबवून ८ नलक्षवाद्यांना कंठस्नान घातले. झारखंडच्या बोकारो जिल्ह्यात आज सकाळी नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये चकमक झाली. त्यात ८ नक्षलवादी ठार झाले असून १ कोटी रुपयांचा इनामी नक्षलवादी नेता विवेक याचाही खात्मा करण्यात आला. ललपनिया परिसरातील लुगू टेकड्या, बोकारो जिल्हा या ठिकाणी ही चकमक झाली. सकाळी ६ वाजल्यापासून पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये ही चकमक सुरू होती.
सीआरपीएफचे कोब्रा कमांडो आणि झारखंड पोलिसांच्या संयुक्त पथकाने केलेल्या कारवाईत ८ नक्षलवाद्यांना ठार करण्यात यश आले. त्यामध्ये विवेक दाचा खात्मा हा सुरक्षा रक्षकांच्या कारवाईचे मोठे यश मानले जात आहे. सुरक्षा जवानांच्या चकमकीत कुख्यात नक्षलवादी प्रयाग मांझी ठार झाला असून काही फरार झालेल्या नक्षलवाद्यांसाठी देखील शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे.
विवेकने अनेक वर्षे
केले चळवळीचे नेतृत्व
विवेक दा हा धनबाद जिल्ह्याच्या टुंडी येथील मानियाडेहचा मूळ रहिवासी होता. कमी वयातच त्याने नक्षल चळवळीत पदार्पण केले होते. त्यामुळे आयुष्यातील मोठा काळ त्याने नक्षलवाद्यांचे नेतृत्व केले. केवळ झारखंडच नाही तर बिहार, ओडिशा आणि छत्तीसगढच्या नक्षल चळवळीत तो सक्रीय होता. बोकारो जिल्ह्यात त्याचा मोठा प्रभाव होता.
गिरीडीह भागात ५० गुन्हे दाखल
गिरीडीह येथील क्षेत्रात त्याच्या एकट्यावर ५० पेक्षा जास्त गुन्हे दाखल होते. नक्षल चळवळीत तो एक रणनीतीकार शस्त्रप्रमुख म्हणून कार्यरत होता. त्याच्याकडे एके ४७, रायफल आणि मोठ्या प्रमाणात स्फोटकेही होती. त्याच्याकडे ५० पेक्षा जास्त नक्षलवादी होते. त्यामुळेच सरकारने त्याच्यावर १ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.