१ मेपासून नियम बदलणार, मर्यादेचे उल्लंघन केल्यास फटका
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशात एटीएम युजर्संची संख्या कोट्यवधींच्या घरात आहे. राष्ट्रीय बँकांसह आता सहकारी आणि पतपेढी बँकांनीदेखील एटीएम सेवा सुरू केल्याने आता गाव तिथे एटीएम पाहायला मिळत आहे. मात्र, आता याच एटीएम ग्राहकांसाठी १ मेपासून नियमांत बदल होत असून, दुस-या एटीएममधून पैसे काढण्यासाठी आता ग्राहकांना ज्यादा पैसे मोजावे लागणार आहेत.
आरबीआयकडून नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या (एनपीसीआय) प्रस्तावास मंजुरी देण्यात आल्यानंतर दुस-या बँकेच्या एटीएम मशिनमधून पैसे काढणे महागणार आहे. १ मे पासून हा बदल लागू होणार आहे. त्यानुसार ठरवून दिलेल्या लिमिटनंतर दुस-या बँकेच्या एटीएममधून पैसे काढल्यास आता १७ ऐवजी १९ रुपये चार्ज लागणार आहे. तसेच बॅलेन्स चेक करण्याचा चार्जदेखील ७ रुपयांवरून ९ रुपयांवर पोहोचला आहे. दरम्यान, सध्या बँकांकडून दुस-या बँकेतील एटीएममधून पैसे काढण्यासाठी मेट्रो शहरात ५ आणि नॉन मेट्रो शहरात ३ व्यवहार मोफत दिले जात आहेत. मात्र, तीनपेक्षा जास्त व्यवहारांवर चार्ज लावण्यात येतो.
एटीएम चार्ज वाढविल्याने एटीएम नेटवर्क ऑपरेटर आणि व्हाईट लेबल एटीएम कंपन्यांकडून इंटरचेंज फीस वाढविण्याची मागणी होत आहे. सध्या त्याचे मेन्टेनन्स आणि ऑपरेशन खर्च पूर्वीच्या तुलनेत वाढलेला आहे. त्यातच नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून ही मागणी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियासमोर ठेवण्यात आली आहे. त्यास आरबीआयने ग्रीन सिग्नल दिला.
डिजिटल व्यवहार
करणे फायदेशीर
एटीएम व्यवहारांवरील चार्ज वाढविल्याने आता त्या बँकांवर अधिक परिणाम होणार आहे. ज्या एटीएम सर्व्हिससाठी दुस-या बँकांवर अवलंबून आहेत. ग्राहकांना आता नॉन होम बँक एमटीएमधून पैसे काढण्यासाठी किंवा पुन्हा बॅलेन्स चेक करण्यासाठी अधिकचा चार्ज द्यावा लागणार आहे. दरम्यान, एटीएम सेवा दरात झालेली वाढ लक्षात घेता ग्राहकांनी आता ज्या बँकांचे एटीएम वापरतो, त्याच बँकांच्या एटीएममधून पैसे काढावे किंवा यूपीआय पेमेंटच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार केल्यास एटीएम चार्जपासून सुटका होऊ शकते.