नवी दिल्ली : वृत्तसंस्था
वक्फ कायदा आणि त्यातील दुरुस्तीविरोधात आज मंगळवारी दिल्लीतील तालकटोरा स्टेडियम येथे मुस्लिम संघटनांनी एल्गार पुकारला. ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने वक्फ बचावची हाक दिली आहे. त्यासाठी मोठे संमेलन आयोजित केले आहे. संघटनेचे महासचिव मौलाना फजलूर रहमान मुजद्दी यांनी म्हणणे मांडले. आम्ही देशाला स्वतंत्र केले. देशासाठी रक्त सांडले. या देशाचे संरक्षण केले. त्याच धरतीवर आज आम्हाला त्रास देण्यात येत आहे, अशी तक्रार त्यांनी केली.
मुजद्दी म्हणाले की, आमच्याकडून मशिदी, दफनभूमी, दर्गा हिसकावण्यात येत आहे. हा काळा कायदा आहे. देशातील लोकशाही आणि धर्मनिरपेक्षता हिसकावणारा हा कायदा आहे. वक्फ कायदा मागे घ्या यासाठी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. वक्फ वाचवा आंदोलनात खालिद सैफुल्लाह रहमानी, असदुद्दीन ओवैसी, जमात ए इस्लामी हिंदचे अध्यक्ष सैयद सदतुल्लाह हुसैनी, मलिक मोहताशिम खान आदी सहभागी झाले होते.
वक्फ वाचवणे हे आपले धार्मिक कर्तव्य आहे. मुस्लिम प्रत्येक गोष्ट सहन करेल. पण शरियतमध्ये हस्तक्षेप सहन करणार नाही, असे त्यांनी ठणकावले. वक्फ कायदा २०२५ आम्ही पूर्णपणे फेटाळतो. जर देशाची घटना वाचवायची असेल तर वक्फ सुधारीत कायदा हा पूर्णपणे हटवायला हवा. हा मुद्दा आम्ही हिंदू-मुस्लीम करण्याचा प्रयत्न आम्ही होऊ देणार नाही. ही लढाई हिंदू-मुस्लिम अशी नाही. काही जण हा मुद्दा तसा करण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला.
एसडीपीआयचे मोहम्मद शफी यांनी यावेळी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू हे नवीन सावरकर असल्याचे ते म्हणाले. मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड सदस्य रफीउद्दीन अशरफीन यांनी तर सरकारला थेट इशारा दिला.