पुणे : प्रतिनिधी
जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मंगळवारी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांकडून झालेल्या गोळीबारात २६ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये महाराष्ट्रातील पाच पर्यटकांचा समावेश आहे. यातील दोन पर्यटक हे पुण्याचे असून, काही पर्यटक अजूनही तिथेच अडकले आहेत. आम्हाला सुखरूप आणण्याची विनंती अडकलेल्या पर्यंटकांकडून प्रशासनाला केली जात आहे.
पुणे शहर व आजूबाजूच्या शिरूर, दौंड इत्यादी ठिकाणचे ६५ प्रवासी हे श्रीनगर येथे अडकले आहेत. पुण्यातील हडपसर येथील आदित्य खटाटे यांनी व्हीडीओ करत शासनाने आम्हाला लवकरात लवकर सुखरूप परत आणावे, अशी विनंती केली आहे.
पुणे, शिरूर, दौंड इत्यादी ठिकाणचे रहिवासी असे एकूण ६५ लोक श्रीनगर येथील हॉटेल माऊंटनमध्ये आहेत. हे सर्व पर्यटक मंगळवारी पहलगामवरून श्रीनगर येथे सुखरूप पोहोचले आहेत. आम्हाला श्रीनगर येथून सुखरूप आपल्या जिल्ह्यात म्हणजेच पुणे येथे पोहोचवावे, अशी विनंती या पर्यटकांकडून प्रशासनास करण्यात आली.