36 C
Latur
Wednesday, April 23, 2025
Homeमहाराष्ट्रहल्लेखोरांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडायला हवा

हल्लेखोरांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडायला हवा

मुंबई : दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाममध्ये बैसरन खो-यात मंगळवारी दुपारी दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात आतापर्यंत २६ पर्यटकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. केंद्र सरकारने या हल्लेखोरांचा आता असा बंदोबस्त करावा की, या हल्लेखोरांच्या पुढच्या १० पिढ्यांच्या ते आठवून सुद्धा थरकाप उडायला हवा. ही घटना अतिशय गंभीर आहे आणि या प्रसंगात सरकारच्या पाठीशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्णपणे उभी राहील, असे त्यांनी म्हटले आहे.

केंद्र सरकारने काश्मीरमधून ३७० कलम हटवले. त्यानंतर सगळे जरा सुरळीत होत आहे आणि पर्यटकांचा ओघ वाढला आहे, असे दिसत असताना, जर असा हल्ला झाला तर भविष्यात काश्मीरमध्ये जमीन विकत घेऊन, उद्योगधंदे कोण सुरू करेल? त्यामुळे केंद्र सरकारने याचा विचार करून ठोस कृती आखावी, असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.

सन १९७२ साली म्युनिक ऑलिम्पिकच्या वेळेस इस्रायली खेळाडूंवर पॅलेस्टिनी अतिरेक्यांनी हल्ला केला होता. यानंतर इस्रायलने या अतिरेक्यांना आणि त्याच्या सूत्रधारांना अशा पद्धतीने मारले होते की, पुढे दीर्घकाळ पॅलेस्टिनी लोकांच्या मनात दहशत बसली होती. भारताचे आणि इस्रायलचे संबंध उत्तम आहेत. केंद्र सरकार इस्रायल सरकारच्या पावलावर पाऊल टाकून या दहशतवाद्यांना आणि त्यांच्या मागच्या सर्वच पाठीराख्यांना कायमच संपवेल, अशी अपेक्षा राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.

हे सगळे करताना केंद्र सरकार कठोर होईल, याबद्दल माझ्या मनात कुठलीच शंका नाही आणि त्यांच्या मागे या देशातील सगळे राजकीय पक्ष उभे राहतील. सरकारने एकदाच काय तो दणका द्यावा. महाराष्ट्र नवनिर्माण सेना नक्की सरकारच्या सोबत असेल, असा विश्वास त्यांनी दिला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR