पुणे : प्रतिनिधी
मोठ्या सहकारी बँकांनी लहान बँकांना मदतीचा हात द्यावा, याकरिता केंद्र सरकारच्या मदतीने सहकारी बँकांसाठी स्वतंत्र अम्ब्रेला ऑर्गनायझेशन (राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळ) स्थापन करण्यात आले आहे, त्याचा जास्तीत जास्त फायदा छोट्या सहकारी बँकांनी करून घ्यावा, असे आवाहन केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी येथे केले.
वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकार व्यवस्थापन संस्थेत (व्हॅम्निकॉम) झालेल्या प्रमुख सहकारी बँकांच्या बैठकीत ते बोलत होते.अम्ब्रेला ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष ज्योतिंद्रभाई मेहता, सीईओ प्रभात चतुर्वेदी, सहकार आयुक्त दीपक तावरे, रिझर्व्ह बँकेचे संचालक सतीश मराठे आणि सहकारी बँकांचे पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीत सहकारी बँकांना येणा-या अडीअडचणी प्रामुख्याने मांडण्यात आल्या. ज्या सहकारी बँकांना भांडवलाची पूर्तता करण्यात अडचणी येत आहेत, त्यांना भांडवलाचा पुरवठा करणे,कायदेविषयक सल्ला देणे, बदलते तंत्रज्ञान आणि त्यासाठी लागणारे अत्याधुनिक साहित्य,येणारा खर्च यासाठी तजवीज करणे, याबरोबरच बँकांना लागणारे मनुष्यबळ, बँकिंगमधील अनुभवी अधिका-यांची गरज अशा विविध मुद्यांवर बँकांनी मुद्दे मांडले व सूचना केल्या.