काश्मीरमध्ये मंगळवारी गत सहा वर्षांतील सर्वांत मोठा दहशतवादी हल्ला झाला. दहशतवाद्यांनी यावेळी पर्यटकांना लक्ष्य केले. पहलगाममधील ‘छोटे स्वित्झर्लंड’ म्हणून ओळखल्या जाणा-या बैसरन भागात दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला. नाव आणि धर्म विचारून त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. या गोळीबारात २७ पर्यटकांचा मृत्यू झाला असून २० हून अधिक जखमी झाले आहेत. मृतांमध्ये महाराष्ट्रातील सहा जणांचा समावेश आहे. त्यात डोंबिवलीचे तिघे, पुण्यातील दोघांचा तर पनवेलमधील एका रहिवाशाचा समावेश आहे. असे सांगण्यात येते की, १० दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार केला. १० दहशतवाद्यांमध्ये ६ जण स्थानिक तर ४ दहशतवादी परदेशी होते. पहलगाममधील दहशतवादी हल्ला हा पाकिस्तानच्या सुनियोजित कटाचा भाग आहे असे सांगण्यात येत आहे. या कटात पाकिस्तानने लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मदसारख्या बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनांचा वापर केला आहे. मंगळवारचा हल्ला अमरनाथ यात्रा सुरू होण्यापूर्वी यात्रेकरू आणि पर्यटकांमध्ये भीती पसरवण्यासाठी करण्यात आला आहे. टीआरएफ संघटना काश्मीरमध्ये मोठे आव्हान बनण्याची शक्यता आहे. या संघटनेला लक्ष्य साधण्यासाठी जंगलात किंवा उंच ठिकाणी लपून बसण्याबद्दलची चांगली माहिती आहे. टीआरएफला फाल्कन स्क्वॉड असेही संबोधतात. हा गट ‘हिट अॅण्ड रन’ या धोरणावर काम करतो. त्यांच्याकडे प्रगत शस्त्रास्त्रे आहेत. टीआरएफ हा लष्कर-ए-तैयबाचाच एक छोटा गट आहे.
या दहशतवाद्यांनी काही दिवसांपूर्वी पहलगाममध्ये रेकी केली होती आणि संधी मिळताच हा हल्ला केला. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळ्या झाडल्यानंतर घटनास्थळावरून पळ काढला. बाजूच्या जंगलात ते पळून गेले. टीआरएफ या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. हल्लेखोर पोलिसांच्या गणवेशात आले होते. पर्यटकांना धर्म विचारून त्यांनी गोळ्या झाडल्या. हल्ल्याची माहिती मिळताच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तातडीने जम्मू-काश्मीरमध्ये दाखल झाले. हल्लेखोरांना सोडणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्यासह देशभरातील अनेक नेत्यांनी नि:शस्त्र पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध केला आहे. काश्मीरमध्ये यंदा मोठ्या संख्येने देशी-विदेशी पर्यटक दाखल झाले आहेत. पहलगाम शहरापासून सहा किलोमीटरवरील बैसरनचे गवताळ पठार हे पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास अनेक पर्यटक खान-पानाचा आनंद घेत असताना दहशतवाद्यांनी त्यांच्या दिशेने बेछूट गोळीबार केला. त्यामुळे पर्यटकांमध्ये गोंधळ उडाला. मोकळे मैदान असल्यामुळे पर्यटकांना कुठे लपण्याची संधीही मिळाली नाही. अंदाधुंद गोळीबार करून अतिरेकी पळून गेले.
स्थानिक लोकांनी खेचरावरून जखमींना रुग्णालयात नेल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. बैसरन खो-यात अरुंद वाट असल्याने चालत किंवा खेचरावरून जावे लागते. दहशतवादी टेकडीवरून खाली उतरले आणि त्यांनी ४० पर्यटकांना घेरून त्यांच्यावर गोळीबार केला. याआधी पहलगाममध्ये अमरनाथच्या तळावर २००० मध्ये झालेल्या हल्ल्यात ३० जण ठार तर ६० हून अधिक जखमी झाले होते. बैसरनमध्ये मोठ्या संख्येने अनेक पर्यटक उन्हाळ्याची सुटी घालवण्यासाठी आले आहेत. त्यामुळे स्थानिक वाहतूक सेवा, शिकाराचालक, हाऊसबोट चालक आणि हॉटेलचा व्यवसाय तेजीत आहे. मात्र आता तेथे दहशतवादी हल्ला झाल्याने या सर्वांच्या उत्पन्नावर गदा आली आहे. या हल्ल्यामुळे जम्मू-काश्मीरमध्ये सावधानतेचा इशारा देण्यात आला. ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली, सामानाची तपासणीही करण्यात येत होती. सुरक्षिततेची उपाययोजना म्हणून जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग १-ए बंद करण्यात आला. त्यामुळे पर्यटकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागला. पहलगाममधील हल्ल्याशी पाकिस्तानचा काहीही संबंध नसल्याचे पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी म्हटले आहे.
त्यांनी या हल्ल्यासाठी भारतालाच जबाबदार धरले आहे. भारतातील लोकांचाच यात हात आहे. भारतातील अनेक राज्यांत सरकारविरोधात रोष आहे. नागालँडपासून काश्मीर आणि छत्तीसगड, मणिपूरमध्ये लोक सरकारविरोधात आहेत. भारत सरकार लोकांच्या हक्कांवर गदा आणत आहे, त्यांचे शोषण करत आहे. अल्पसंख्याकांचे शोषण होत आहे. त्याविरोधात लोक उभे आहेत. आमचा याच्याशी काही संबंध नाही, आम्ही दहशतवादी कृत्यांचे समर्थन करत नाही असे आसिफ म्हणाले. दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदी सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून दिल्लीत परतले. दिल्ली विमानतळावरच त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि परराष्ट्र सचिवांसोबत बैठक घेतली. गृहमंत्री अमित शहा जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीचा आढावा घेत आहेत. दहशतवाद्यांना पकडण्यासाठी सुरक्षा यंत्रणांनी कारवाई सुरू केली आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर आपल्यावर सर्जिकल स्ट्राईक होतो की काय अशी पाकिस्तानला भीती वाटत आहे. तेथे पाकिस्तानी हवाई दल अलर्ट मोडवर होते. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला असून दहशतवादाविरोधात देश एकजूट आहे असे म्हटले आहे. जम्मू-काश्मीरमध्ये परिस्थिती सामान्य असल्याचा फसवा दावा करण्याऐवजी सरकारने या प्रकरणी जबाबदारी घेत ठोस पावले उचलावीत असे म्हटले आहे. दहशतवादी हल्लेखोरांना आणि सूत्रधारांना आम्ही सोडणार नाही. दहशतवादी अजेंडा कधीच यशस्वी होणार नाही असे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे. दहशतवादाविरुद्धचा लढा आता अंतिम टप्प्यात आला असून त्याचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी भारतीयांनी आपसातील मतभेद विसरून एक झाले पाहिजे. मानवतेची हत्या करणा-यांना जिवंत राहण्याचा अधिकार नाही.