37.3 C
Latur
Thursday, April 24, 2025
Homeसोलापूरबाथरूममध्ये गोळी झाडली, पिस्तूल मात्र बेडवर!

बाथरूममध्ये गोळी झाडली, पिस्तूल मात्र बेडवर!

डॉ. वळसंगकरआत्महत्येचे प्रकरण अधिकच गूढ 

सोलापूर : प्रतिनिधी
न्युरॉलॉजिस्ट डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येचे प्रकरण अधिकच गूढ बनत चालले आहे. वळसंगकरांनी बाथरूममध्ये गोळ्या झाडून आत्महत्या जरी केली असली तरी, मात्र पोलिस तपासात पिस्तूल बेडरूममध्ये सापडली आहे. तसेच आरोपी मनीषा मुसळे-माने हिचा माफीनामा देखील बेडरूममध्ये सापडला आहे. संशयाची सुई मनीषा यांच्याकडे वळली पाहिजे म्हणून तर पिस्तूल ठेवली नसेल ना? असा काही हेतू आरोपीचा होता का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टरांच्या आत्महत्येनंतर पोलिसांनी त्यांच्या खोलीची तपासणी केली. वळसंगकरांच्या खोलीत अनेक वस्तू सापडल्या आहेत. बाथरूममध्ये काडतूस, गोळीची पुंगळी, नॅपकिन, बुलेटवरील तांब्याचे आवरण, बुलेटमधील शिसे अशा काही वस्तू सापडल्या आहेत. पण ज्या पिस्तूलमधून त्यांनी स्वत:वर गोळी झाडली, ती पिस्तूल मात्र, बेडरूममध्ये सापडली आहे.

तसेच मनीषा मुसळे-माने या आरोपी महिलेचा माफिनामा बेडरूममध्ये पिस्तूलजवळ सापडला आहे. तसेच पिस्तूलसोबत एक पेनड्राईव्ह, २ मोबाईलही सापडले आहेत. या वस्तूंचा सखोल तपास अद्याप पोलिसांकडून करण्यात आलेला नाही. या वस्तू तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आल्या आहेत.

आर्थिक व्यवहारातून कट रचल्याची माहिती
मनिषा माने या आरोपी महिलेला अटक केल्यानंतर पोलिसांनी रुग्णालयातील सुपरवायझर, अकाऊंटंट आणि कॅशिअरसह काही कर्मचा-यांची चौकशी केली. रुग्णालयाने वस्तू खरेदी केल्यावर मनीषा वाढीव बिल सादर करून पैसे उकळत होती.

ही बाब वळसंगकर यांना समजल्यानंतर त्यांनी, परवानगीशिवाय कोणताही व्यवहार न करण्याच्या सूचना रुग्णालयातील प्रशासनाला दिल्या. त्यानंतर मनीषा या महिलेच्या वागणुकीत काही बदल घडले. याच अनुषंगाने पोलिसांनी रुग्णलयातील कर्मचा-यांची तसेच कार्यालयाची झडती घेतली. काही कागदपत्रेही जप्त केली. या हत्येमागे आर्थिक गैरव्यवहाराचे तर कारण नाही ना? याचाही तपास सुरू आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR