पहलगाम दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्या पर्यटकांवरील अंत्यसंस्काराची आग विझणार नाही तोवर पाकिस्तानचा बदला घेण्याची जोरदार मागणी होत आहे. बदल्याची आग सर्वांच्या हृदयात पेटलेली आहे. अशातच पाकिस्तान देखील रात्रभर दहशतीत होता. काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानी लष्कर प्रमुखांनी भारतीयांविरोधात गरळ ओकली होती. आता भारताची जोरदार प्रत्यूत्तर देण्याची वेळ आली आहे.
भारत आता हल्ला करणार या भीतीने पाकिस्तानची गाळण उडाली आहे. भारत गेल्यावेळसारखा पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसू शकतो, अशी भीती पाकिस्तानला वाटत आहे. यामुळे पाकिस्तानी एअरफोर्सने अख्खी रात्र जागून काढली. पाकिस्तानी लष्कर प्रमुख आसिम मुनीर यांनी मंगळवारी सायंकाळी तिन्ही दलांची बैठक घेतली. यानंतर लगेचच चिनी बनावटीची १८ लढाऊ विमाने एलओसीच्या दिशेने पाठविण्यात आली होती.
भारत जमिनीवरून हल्ला करणार नाही, असे मुनीर यांना वाटत आहे. यामुळे हवाई हल्लाच होईल असा त्यांचा अंदाज आहे. यामुळे सर्व २० फायटर जेट स्क्वॉड्रनना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे.