श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. बुधवारी सरकारने पाकिस्तानविरुद्ध ५ मोठे निर्णय घेतल्यानंतर, आता गुरूवारी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि गृहमंत्री अमित शाह, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना भेटण्यासाठी पोहोचले आहेत. सुरक्षा परिस्थितीचे गांभीर्य आणि भविष्यातील रणनीतींवर चर्चा करण्याच्या दृष्टीने ही उच्चस्तरीय बैठक महत्त्वाची मानली जाते.
यासोबतच, परराष्ट्र मंत्रालयात एक महत्त्वाची बैठकही सुरू आहे, ज्यामध्ये अनेक देशांच्या राजदूतांना बोलावण्यात आले आहे. जर्मनी, जपान, पोलंड, ब्रिटन आणि रशियासह अनेक देशांचे राजदूत परराष्ट्र मंत्रालयाच्या कार्यालयात पोहोचले आहेत. या राजदूतांना पहलगाम दहशतवादी हल्ल्याची सविस्तर माहिती दिली जात असून भारताच्या सुरक्षाविषयक चिंतांबद्दल जाणीव करून दिली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, परराष्ट्र मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी त्यांना हल्ल्यामागील संभाव्य दहशतवादी संघटना, पाकिस्तानची भूमिका आणि सुरक्षा एजन्सींनी केलेल्या कारवाईबद्दल माहिती देतील.
दरम्यान, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी शुक्रवारी स्वत: परिस्थितीचा आढावा घेतील आणि बैसरनमधील हल्ल्याच्या ठिकाणाला भेट देतील. ते लष्करी कमांडर आणि स्थानिक अधिका-यांसोबत तेथील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेऊन भविष्यातील रणनीती ठरवतील. लष्कराच्या या पावलाला दहशतवादाविरुद्ध निर्णायक कारवाईसाठी एक मजबूत संकेत मानले जात आहे.
हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी पहलगाम आणि आसपासच्या भागात शोध मोहीम तीव्र केली आहे. सुरुवातीच्या तपासात पाकिस्तानी दहशतवाद्यांना स्थानिक मदत मिळाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. एनआयए, आयबी आणि लष्करी गुप्तचर संस्था हल्ल्याशी संबंधित प्रत्येक पैलूचा सखोल तपास करत आहेत. घटनास्थळावरुन जप्त केलेल्या शस्त्रास्त्रे आणि इतर उपकरणांची तपासणी कुन दहशतवाद्यांचे स्रोत शोधले जात आहेत.