लातूर : प्रतिनिधी
महावितरणच्या लकी डिजिटल ग्राहक योजनेचा पहिला लकी ड्रॉ ऑनलाईन पध्दतीने दि. ७ एप्रिल रोजी काढण्यात आला होता. या लकी ड्रॉ मधील विजेत्यांना स्मार्ट फोन व वॉचचे वाटप दि. २४ एप्रिल रोजी मुख्य अभियंता अरविंद बुलबुले यांच्या हस्ते करण्यात आले.
विद्युत भवन येथील येथे लेखा व वित्त विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक जालींदर मंगळवेढेकर, कार्यकारी अभियंता गणेश सामसे. अतिरिक्त कार्यकारी अभियंता ज्योती कुमठेकर, अतिरिक्त कार्यकारी अभियंता सुबोध डोंगरे, व्यवस्थापक लेखा आदित्य पाटील, दयानंद बनसोडे तसेच दिनेश ठाकूर यांच्या प्रमूख उपस्थितीत प्रातिनिधिक स्वरूपात मुख्य अभियंता अरविंद बुलबुले यांच्या हस्ते लातूर शहरातील विजेते सुकेशना कांबळे, नियामत हांसुरे, अभिमन्यु पाटील, बालाजी व्यवहारे आणि तुकाराम जाधव यांना बक्षिसांचे वाटप करण्यात आले. उर्वरीत विजेत्यांना त्या-त्या उपविभाग कार्यालयात वाटप करण्यात येत आहे.
लातूर परिमंडळातील प्रत्येक उपविभाग स्तरावर एक या प्रमाणे पहिल्या क्रमांकाकरिता ३९ विजेत्या ग्राहकांना सॅमसंग कंपनीचा स्मार्ट फोन बक्षिस म्हणून दिले जात आहे. तर प्रत्येक उपविभागात प्रत्येकी दोन प्रमाणे दुस-या क्रमांकासाठी ७८ विजेत्या ग्राहकांना एमआय कंपनीचा स्मार्ट फोन व प्रत्येकी दोन प्रमाणे तिस-या क्रमांकासाठी ७८ विजेत्या वीजग्राहकांना फास्टट्रॅक कमपनीचे स्मार्ट वॉच बक्षिस म्हणून दिले जात आहे. यापुढील लकी ड्रॉ ७ मे ला काढण्यात येणार आहे. विजेत्या ग्राहकांची यादी महावितरणच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.