पुणे : ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पहेलगाम दहशतवादी हल्ल्याविषयी प्रतिक्रिया देताना अचूक टायमिंग साधले. त्यांनी सरकारच्या निर्णयासोबत असल्याचे जाहीर केले. पण त्याचवेळी एका महत्त्वाच्या मुद्दाला हात घातला असून देशावर अनेक हल्ले झाले मात्र धर्माची चर्चा आज का होतेय असा सवाल केला आहे.
जम्मू-काश्मीर गेल्या पाच दशकांपासून दहशतवादाचा सामना करत आहे. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाने येथील विकास खुंटवला आहे. पहेलगाम येथील दहशतवादी हल्ल्याने देशात संतापाची लाट उसळली आहे. निरपराध २६ पर्यटकांना नाहक जीव गमवावा लागला आहे. दहशतवाद्यांनी धर्म विचारून गोळ्या घातल्या.
पर्यटकांवर धर्म विचारून गोळ्या घातल्या या प्रश्नावर शरद पवार यांनी मत व्यक्त केले. ते म्हणाले, मला माहीत नाही. यात काय तथ्य आहे. माहीत नाही. जे प्रवासी होते, त्यात त्यांनी स्त्रियांना सोडलेले दिसत आहे. पुरुषांना गोळ्या घातल्या. पुण्यात दोघांचे मृत्यू झाले. त्यातील दोन लोकांच्या घरी मी गेलो होतो. घरी गेल्यावर त्या भगिनी तिथे होत्या. त्या मला सांगत होत्या. आम्हाला कुणालाही हात लावला नाही. आमच्या पुरुषांना गोळ्या घातल्या. लोकसभेतील नेत्यांना बोलावले होते. आमच्या पक्षाच्या सुप्रिया सुळे या लोकसभेच्या नेत्या आहेत. मी राज्यसभेचा आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे गेल्या होत्या.
ही धर्माविरोधी लढाई?
पहेलगाम येथील हल्ला ही धर्माविरोधी लढाई वाटते का असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्यावर शरद पवार यांनी अचूक टायमिंग साधले. ते म्हणाले यापूर्वीही अतिरेक्यांनी हल्ले केले. पुलवामात हल्ला केला. या आधी तीन चार ठिकाणी अतिरेक्यांनी हल्ला केला. तेव्हा धर्माची चर्चा झाली नाही. आज का होतेय. घडले ते वाईट आहे. आव्हान आहे देशाला. सक्तीने तोंड द्यावे लागेल. पण त्या निमित्ताने धार्मिक अडसर येण्याचे काम करू नये.
आम्ही सरकारसोबत
यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या दाव्याची पोलखोल केली. पहलगाम हे ठिकाण अधिक सेफ आहे. दोन तीन महिन्यांपूर्वी मी गेलो होतो. सातत्याने आपले लोक जातात. हे घडले ते पहलगामला घडले. याचा अर्थ दहशतवादी प्रवृत्तीविरूद्ध आपण यश मिळवले असा निष्कर्ष आपण काढत आहोत तर तो थोडा सावध काढला पाहिजे आणि काळजी घेतली पाहिजे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
दहशतवाद संपविला की नाही?
आम्ही दहशतवाद संपवला, आता काही चिंता नाही असे सांगितले जात होते, असा चिमटा त्यांनी काढला. पण ठीक आहे, उदाहरण पाहिले आपण याचा अर्थ कुठे ना कुठे तरी अजूनही कमतरता आहे. ती कमतरता घालवली पाहिजे. देशावर हल्ला झाला असेल, सरकार गांभीर्याने निर्णय घेत असेल आणि कमतरता आहे असं मान्य करत असेल तर तातडीने ती कमतरता काढली पाहिजे. त्याही कामात आम्हा लोकांचं सरकारला सहकार्य राहील, अशी भूमिका शरद पवार यांनी जाहीर केली.