31.6 C
Latur
Friday, April 25, 2025
Homeअंतरराष्ट्रीयपाकिस्तानचे १ कोटी लोक उपासमारीच्या उंबरठ्यावर!

पाकिस्तानचे १ कोटी लोक उपासमारीच्या उंबरठ्यावर!

गरीबीचा इशारा । जीडीपीच्या तुलनेत कर्जाचा बोजा वाढणार; तांदूळ, बाजरीसह संपूर्ण कृषी उत्पादनावर होणार परिणाम

कराची : वृत्तसंस्था
जम्मू-काश्मीरच्या पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानविरोधात कडक पावले उचलायला सुरुवात केली आहे. अशातच आता पाकिस्तानातून आणखी एक वाईट बातमी समोर येत आहे. एकीकडे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पाकिस्तानचा विकास दर कमी राहण्याची शक्यता वर्तवली असतानाच दुसरीकडे जागतिक बँकेने पाकिस्तानला मोठा इशारा दिला आहे. चालू आर्थिक वर्षात सुमारे १ कोटी लोकांना उपासमारीचा सामना करावा लागेल, असा इशारा जागतिक बँकेने दिला आहे. यासोबतच गरिबीची पातळीही झपाट्याने वाढणार असल्याची माहिती अहवालात दिली आहे.

पाकिस्तानातील वाढत्या गरिबीचा इशारा देण्यापूर्वी जागतिक बँकेने आपल्या अहवालात तेथील आर्थिक विकास दर २.७ टक्के राहील असा अंदाज व्यक्त केला होता. जागतिक बँकेने यासाठी पाकिस्तानातील कठोर आर्थिक धोरणांना जबाबदार धरले आहे.

संपूर्ण कृषी उत्पादनावर परिणाम
जागतिक बँकेने आपल्या अहवालात म्हटले आहे की, शाहबाज शरीफ यांचे सरकार वार्षिक वित्तीय तुटीचे लक्ष्य पूर्ण करण्यात अयशस्वी ठरले आहे आणि यामुळे जीडीपीच्या तुलनेत पाकिस्तानवरील कर्जाचा बोजा आणखी वाढण्याची अपेक्षा आहे. अहवालानुसार, जागतिक बँकेने म्हटले आहे की, हवामानामुळे पाकिस्तानच्या संपूर्ण कृषी उत्पादनावर परिणाम होईल आणि तांदूळ, बाजरी यासारख्या प्रमुख पिकांवर वाईट परिणाम होईल. यामुळं पाकिस्तानमधील सुमारे १० दशलक्ष लोक (बहुतेक ग्रामीण भागात) उपासमारीच्या उंबरठ्यावर पोहोचतील.

पाकिस्तानमध्ये गरिबी वाढणार
अन्नटंचाई, गरिबी, बेरोजगारीमध्ये वाढ होणार असल्याची माहिती अहवालात देण्यात आली आहे. कृषी, उत्पादन आणि इतर कमी वेतनाच्या सेवांसारख्या प्रमुख क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल, ज्यामुळे दैनंदिन वेतन देखील वाढू शकणार नाही अशी माहिती अहवालात देण्यात आली आहे. जागतिक बँकेने पाकिस्तानसाठी आणखी एक इशारा दिला आहे, की चालू आर्थिक वर्षात त्यांच्या लोकसंख्येपैकी सुमारे २ टक्के किंवा १९ लाख लोक दारिद्य्ररेषेखाली येतील. शिवाय, पाकिस्तानचे रोजगार-ते-लोकसंख्येचे प्रमाण ४९.७ टक्के आहे, जे विशेषत: तरुण आणि महिलांमधील कमी श्रमिक बाजारातील सहभागाचे प्रमाण दर्शवते. पाकिस्तानची सध्या आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. मोठ्या प्रमाणात लोकसंख्या ही दारिद्य्ररेषेखाली असल्याचे समोर आले आहे.

दरडोई उत्पन्न ५८५ रुपये
प्रत्येक माणूस दिवसाला फक्त ५८५ रुपये कमवतो. तेथील ८४ टक्के लोकसंख्या ही दारिद्य्ररेषेखाली आहे. पाकिस्तानने ‘आयएमएफ’कडे अनेकदा मदत मागितली आहे पण पाकिस्तानची कृती आणि परिस्थिती पाहता पैसे द्यायला तयार नाही. २०२४ च्या ताज्या आकडेवारीवरून पाकिस्तानातील सर्वसामान्यांचे जीवन किती कठीण झाले आहे याची साक्ष मिळते. देशातील गरिबी, बेरोजगारी आणि आर्थिक विषमतेचे खरे चित्र दाखवणारा हा आकडा आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR