लातूर : प्रतिनिधी
जम्मु-काश्मिर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्ल्याच्या निषेधार्थ दि. २५ एप्रिल रोजी लातूर बंदचे आवाहन सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आले होते. या बंदला लातूरकरांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. गंजगोलाई, मेन रोड, महात्मा गांधी चौकापासुन ते शहरातील पश्चिम, दक्षीण व उत्तर भागातील व्यावसायही बराच बंद होते.. पहलगाममध्ये पाकिस्तानधार्जिण्या दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला केला. या घटनेमुळे संपुर्ण देशभर पाकिस्तानविरोधात संतापाची लाट उठली आहे.
तरुणांमध्ये पाकिस्तानविषयी प्रचंड रोष आहे. सकल हिंदू समाजाच्या तरुणांनी सकाळी गंजगोलाई येथून फेरी काढली. हनुमान चौक, सुभाष चौक, भूसार लाईन, मस्जिद रोडने पुन्हा गंजगोलाई. तेथून मेन रोड, हनुमान चौक, महात्मा गांधी चौक, मिनी मार्केट चौक, लोकमान्य टिळक चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत तसेच तेथून राजीव गांधी चौक परत छत्रपती शिवाजी महाराज चौकातून संविधान चौक, परत छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जुना रेणापूर नाक्यावर जाऊन पुन्हा छत्र पती शिवाजी महाराज चौकात फेरीचा समारोप करण्यात आला.
यावेळी आंदोलनकर्त्यांनी हाता झेंडे घेऊन पाकिस्तानविरोधी, दहशतवादविरोधी घोषणाबाजी केली. या आंदोलनामध्ये देविदास काळे, मनोज डोंगरे, गणेश गोमसाळे, श्रीकांत रांजणकर, राधिका पाटील, नितीन लोखंडे, राहूल अंधारे, गणेश कसबे, राहूल भूतडा, राजसिंह चौहाण, प्रदीप पाटील, भगवेश्वर धनगर, प्रशांत पाचंगे यांच्यासह सकल हिंदू समाज व विविध संघटनांचे पदाधिकारी, नागरिक सहभागी झाले होते.