बीड : सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणानंतर संपूर्ण बीड जिल्हा राज्यात नव्हे तर देशात चर्चेत आला आहे. दरम्यान, बीडची गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली असतानाच, बीडच्या नेकनूर पोलिस ठाणे हद्दीतून आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बीडच्या नेकनुर पोलिस ठाणे हद्दीत १४ वर्षीय मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना उजेडात आली आहे.
दरम्यान हे संतापजनक कृत्य करणा-या तरुणाविरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पवन निर्मळ असे या आरोपीचे नाव असून या घटनेनंतर तो फरार झाला असल्याची माहिती पुढे आली आहे. पुढे आलेल्या माहितीनुसार, पवन निर्मळने नात्यातीलच एका १४ वर्षीय मुलीच्या घरी जाऊन मुली सोबत अश्लील लैंगिक चाळे केले. कालांतराने घटनेची माहिती मुलीने कुटुंबीयांना दिल्यानंतर पवन विरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
धक्कादायक बाब म्हणजे या आरोपीचे अनेक रिल्स नेकनूर पोलिस ठाण्यातील कर्मचा-यांसोबत असल्याचे समोर आले आहे आणि हेच रिल्स सध्या समाज माध्यमांवर व्हायरल देखील होतायत. आरोपीच्या अटकेसाठी नेकनूर पोलिसांचे एक पथक रवाना करण्यात आले आहे. मात्र आरोपी हा पोलिसांच्या जवळचा असल्याने त्याच्यावर कारवाई होत नसल्याचा आरोप मुलीच्या नातेवाईकांकडून करण्यात आला आहे.