पुणे : हिंदू आहेत म्हणून दहशतवाद्यांनी पर्यटकांना गोळ्या घातल्या असे म्हणतात. पण यात काय सत्य आहे याची मला माहिती नाही. पण तिथे जे लोक होते त्यातल्या स्त्रियांना सोडले आहे. मी एका भगिनीच्या घरी गेलो होतो. त्यावेळी त्यांनी सांगितले आम्हा महिलांना हात लावले नाही. त्यांनी फक्त आमच्या पुरुषांना हात लावला असे विधान शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनी केले. शरद पवारांच्या या वक्तव्यावरुन मनसेचे ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन यांनी निशाणा साधला.
शरद पवारांचे वक्तव्य दुर्दैवी आणि राजकीय सोयीचे आहे. नेहमी शरद पवार नरो वा कुंजरो अशी भूमिका घेतात. पीडित कुटुंबाला भेटायला गेलेल्या शरद पवारांना महिलांनी सांगितले की, टिकल्या काढल्या म्हणून आम्ही वाचलो…अजून शरद पवारांना काय पुरावा पाहिजे?, त्यांना नेमकी कुठली भीती वाटते? ते मुस्लिमांचे एवढे का लांगूलचालन करतात?, असा सवाल प्रकाश महाजन यांनी उपस्थित केला. हिंदू म्हणून त्यांनी मारले हे कटू सत्य का शरद पवार नाकारतात?, तुम्ही ढोगी म्हणून पुरोगामित्व का मिरवून घेता?, हिंदू म्हणून मारले हे का मान्य करत नाही?, असा प्रश्नही प्रकाश महाजन यांनी शरद पवारांना विचारला.
पहलगाम हल्यात मृत्यू पावलेला मुस्लिम व्यक्तीमुळे बाकीचे बलिदान धर्माच्या नावावर नव्हते असे म्हणता येत नाही. तो मयत व्यक्ती बकरवाल सामजाचा होता. त्याला इस्लाम जवळचा समजत नाही, तरीही त्या माणसाने माणुसकीचा विचार केला, असे प्रकाश महाजन म्हणाले. हिंदू कोणाची धार्मिक भावना दुखावत नाही. १० वर्षाच्या मुलाने माझ्या वडिलांना हिंदू म्हणून मारल्याचे सांगितले आहे, हे तुम्ही का नाकारता? दहशतवादी हिंदूंना मारायला आले होते. नाहीतर त्यांनी चौफेर गोळीबार केला असता. महिलांना उदात्त हेतूने सोडले नाही, त्यांना इतरांना सांगण्यासाठी सोडले असेही प्रकाश महाजन म्हणाले.