मुंबई : महाराष्ट्रात पाकिस्तानी नागरिक हरवले आहेत, अशी चर्चा सुरु होती. यावर रविवार दि. २७ एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले आहे. माध्यमांनी यासंदर्भातील बातम्या देताना खबरदारी घ्यावी, असा सल्ला मुख्यमंत्री फडणवीसांनी माध्यमांना दिला आहे. राज्यातील एकही पाक नागरिक हरवला नसून सर्वांना परत पाठविण्याचे कार्य सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने राबविलेल्या ५ कलमी कारवाईपैकी एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करणे. बहुतेक व्हिसा धारकांना देश सोडण्याची अंतिम तारीख आज २७ एप्रिल आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी सर्व मुख्यमंत्र्यांना त्यांच्या राज्यातील पाकिस्तानी लोकांना ओळखून त्यांना परत पाठवण्यास सांगितले आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी उपरोक्त माहिती दिली.
पुणे महानगरपालिकेला ७५ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल पुणे अर्बन डायलॉग हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील बेपत्ता झालेल्या पाकिस्तानी नागरिकांबाबत भाष्य केले. गृहमंत्री म्हणून सांगतो, पाकिस्तानी नागरिकांसंदर्भात कृपया चुकीच्या बातम्या करु नका.
माध्यमांनी १०७ नागरिक हरविल्याचा केला दावा
माध्यमांनी १०७ नागरिक हरवले असल्याच्या बातम्या केल्या आहेत. परंतु राज्यातील एकही पाकिस्तानी नागरिक हरवले नाही. सर्वच पाकिस्तानी नागरिक सापडले आहेत. जेवढे पाकिस्तानी आहेत ते सर्व सापडले आहेत. सर्व बाहेर चालले आहेत. सगळ्यांची बाहेर घालवायची व्यवस्था केली आहे. राज्यात एकही पाकिस्तानी नागरिक राहणार नाही. आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत सर्वांना परत पाठवण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.