नवी दिल्ली : वृत्तसंस्था
पहलगाम दहशतवादी हल्ल्याविरुद्ध भारताला जागतिक पाठिंबा मिळत असताना, पाकिस्तानवर दबाव वाढत आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी या हल्ल्याच्या तटस्थ, पारदर्शक आणि विश्वासार्ह चौकशीसाठी पाकिस्तान तयार असल्याचे म्हटले आहे.
खैबर पख्तुनख्वा प्रांतातील काकुल येथील पाकिस्तान मिलिटरी अकादमीमध्ये पासिंग-आउट परेडला संबोधित करताना पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारतासोबत वाढत्या तणावावर आपले मौन सोडले. ते म्हणाले की, पाकिस्तान काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या तटस्थ आणि पारदर्शक चौकशीत सहकार्य करण्यास तयार आहे. शांततेला आमची पसंती आहे. आम्ही आमच्या अखंडतेशी आणि सुरक्षिततेशी कधीही तडजोड करणार नाही, असे ते म्हणाले.
पाकिस्तानकडून गोळीबार : पाकिस्तानी सैन्याने नियंत्रण रेषेवर विनाकारण गोळीबार केला. त्याला भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर दिले. लष्करी सूत्रांनी ही माहिती दिली. दोन्ही देशांमधील तणाव वाढला असताना सलग दुस-या रात्रीही गोळीबार सुरूच राहिला. गुरुवारी रात्रीही पाकिस्तानी सैनिकांनी नियंत्रण रेषेवरील भारतीय चौक्यांवर गोळीबार केला होता आणि भारताने त्याला चोख प्रत्युत्तर दिले होते. या गोळीबारात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
दरम्यान, अमेरिका आणि पाश्चात्त्य देशांनी फूस दिल्यामुळे पाकिस्तानमध्ये गेल्या ३० वर्षांपासून दहशतवाद्यांना प्रशिक्षण (ट्रेनिंग) दिले जात आहे, अशी कबुली पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी दिली आहे.