37.1 C
Latur
Monday, April 28, 2025
Homeक्रीडामुंबई इंडियन्सची लखनौ सुपरजायंट्सवर ५४ धावांनी मात

मुंबई इंडियन्सची लखनौ सुपरजायंट्सवर ५४ धावांनी मात

 

मुंबई : वृत्तसंस्था
आयपीएल २०२५ स्पर्धेत सुरवातीला अडखळत सुरुवात झालेल्या मुंबई इंडियन्स संघाच्या विजयाची गाडी आता रूळावरून सुसाट धावू लागली आहे. रविवारी दुपारी वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात मुंबईने लखनौ सुपर जायंट्स संघाला ५४ धावांनी हरवले.

मुंबईच्या २१५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना निर्धारीत २० षटकांत लखनौचा संघ सर्वबाद १६१ धावा करू शकला. या विजयानंतर मुंबई इंडियन्सने पॉईंट टेबलमध्ये पाचव्या स्थानावर झेप घेतली आहे.
मुंबई इंडियन्सच्या २१६ या लक्ष्याचा पाठलाग करताना लखनौ सुपर जायंट्सला सलामीवर ऐडन मार्क्रमच्या विकेटच्या रूपात पहिला धक्का बसला. तो अवघ्या ९ धावांवर माघारी परतला. पण दुसरा सलामीवीर मिचेल मार्श (३४) आणि निकोलस पुरन (२७) यांनी फटकेबाजी करत धावफलक हलता ठेवला.

कर्णधार रिषभ पंत अवघ्या ४ धावांवर तंबूत परतला. आयुष बदोनी याने ३५ तर डेव्हिड मिलरने २४ धावा केल्या. त्यानंतरचे फलंदाज फारशी चमक दाखवू शकले नाहीत.
मुंबईकडून जसप्रीत बुमराह याने सर्वाधिक ४ विकेट घेतल्या. ट्रेंट बोल्टने ३, विल जॅक्सने २ तर कॉर्बिन बॉशने १ विकेट घेतली. लखनौ संघाने सर्वबाद १६१ धावा केल्या.

रिकलटन, सूर्यकुमारची अर्धशतके

तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने निर्धारित २० षटकांत ७ बाद २१५ धावा केल्या. रोहित शर्मा अवघ्या १२ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतर दुसरा सलामीवीर रायन रिकलटन याने ३२ चेंडूत ६ चौकार आणि ४ षटकारांच्या सहाय्याने ५८धावा फटकावल्या. त्याला विल जॅक्सची २१ चेंडूत २९ धावांची साथ मिळाली. त्यानंतर सूर्यकुमार यादव याने अवघ्या २८ चेंडूत चार चौकार आणि चार षटकारांच्या सहाय्याने ५४ धावा फटकावल्या. लखनौकडून मयांक यादव आणि आवेश खान यांनी प्रत्येकी २ तर प्रिन्स यादव, दिग्वेश राठी, रवी बिष्णोई यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR