अलर्ट जारी, १० हजार सीसीटीव्ही कॅमे-यांची नजर
मुंबई : प्रतिनिधी
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यात देशाच्या २७ नागरिकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट पसरली आहे. त्यामुळे या घटनेवर जगभरातून संताप व्यक्त होत आहे. या हल्ल्यात परदेशी नागरिकांचाही मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर मुंबईत अलर्ट जारी करण्यात आला असून, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) रेल्वे स्थानकावरील सुरक्षा वाढविली असून, येथील हालचालींवर १० हजार कॅमे-यांची नजर आहे.
दहशतवादी हल्ल्याच्या घटनांचा इतिहास पाहिला तर या हल्ल्यांमध्ये मुंबईचे मोठे नुकसान झाले आहे. मुंबईत एकेकाळी साखळी बॉम्बस्फोट घडवून आणला. त्यानंतर २६/११ चा दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्याच्या जखमा कधीही भरून निघणार नाहीत, अशा आहेत. पहलगाम येथील हल्ल्यानंतर अतिरेक्यांकडून पुन्हा मुंबईला लक्ष्य केले जाऊ शकते. कारण मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. याआधीच्या हल्ल्यात मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकावर (सीएसएमटी) येऊन दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता. त्यामुळे अशा घटनेची पुनरावृत्ती घडू नये, यासाठी पोलिस सतर्क झाले आहेत. त्यामुळे रेल्वे स्थानकावर सुरक्षा वाढविली आहे.