37.1 C
Latur
Monday, April 28, 2025
Homeराष्ट्रीयएनआयएच्या तपासाला वेग

एनआयएच्या तपासाला वेग

पहलगाम हल्ल्यातील नमुने फॉरेन्सिक लॅबकडे, प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदविणे सुरू

अनंतनाग : वृत्तसंस्था
पहलगाम हल्ल्याच्या तपासाची जबाबदारी राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) सोपविताच आता तपासाला वेग आला आहे. एनआयएने लगेचच घटनास्थळावरील एके-४७ आणि एम-४ रायफल्सची रिकामी काडतुसे जप्त केली असून, याच्यासह घटनास्थळावरून ताब्यात घेतलेले सर्व साहित्य व इतर नमुने फॉरेन्सिक लॅबकडे पाठवण्यात आले आहेत. तसेच सर्व प्रत्यक्षदर्शीचा जबाब नोंदविण्यास सुरुवात केली आहे. या हल्ल्यात मारले गेलेल्या पर्यटकांच्या कुटुंबाचेही जबाब नोंदवले जात आहेत.

दहशतवाद्यांनी पहलगाम येथील बैसरन मैदानात पर्यटकांवर हल्ला केला होता. यामध्ये २७ पर्यटकांना जीव गमवावा लागला होता तर अनेक जण गंभीर जखमी झाले होते. २२ एप्रिल रोजी ही घटना घडली होती. या प्रकरणात या प्रकरणात आता एनआयएने तपासाला सुरुवात केली असून, एनआयएची टीम पहलगाम येथे दाखल झाली. तिथे त्यांनी कसून तपास सुरू केला असून, येथील घटनेविषयी उपस्थित असलेल्या स्थानिकांकडून माहिती घेण्यात येत आहे. तसेच दुकानदारांचीही चौकशी करण्यात येत आहे.

यासोबतच फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी दाखल झाली असून, मैदानवरील प्रवेश आणि बाहेर पडण्याच्या मार्गाचा बारकाईने तपास करण्यात येत आहे. एनआयए या हल्ल्याचे दहशतवादी कनेक्शन, त्यांची पद्धत, त्यांना स्थानिकातून कोणी मदत केली, संभाव्य स्लीपर सेल्स यांची कुंडली बाहेर काढणार आहे. एनआयएने बैसरन खो-याच्या ५ किलोमीटरच्या परिसरात उपस्थित लोकांची यादी तयार केली असून त्यांची चौकशी केली जाणार आहे. त्याचबरोबर बैसरन खो-यात येण्याचे आणि जाण्याचे सगळे मार्ग बारकाईने तपासले जात आहेत.

दरम्यान, प्राथमिक तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार ४ दहशतवादी दोन गटांत विभागले होते. त्यांनी दोन बाजूंनी गोळीबार केला. दुपारी अडीचच्या सुमारास दुकानांच्या मागे लपलेले २ अतिरेकी समोर आले. त्यानंतर दहशतवाद्यांनी ठरवून पर्यटकांच्या डोक्यात गोळ््या घातल्या. सुरुवातीला २ दहशतवाद्यांनी ४ पर्यटकांच्या डोक्यात गोळ््या घातल्यानंतर गोंधळ उडाला. त्यानंतर इतर २ अतिरेकी समोर आले. त्यांनी पळून जाणा-या लोकांवर गोळीबार सुरू केला, असे एनआयएच्या अधिका-यांचे म्हणणे आहे.

रिकामी काडतुसे जप्त
एनआयएने एके-४७ आणि एम-४ रायफल्सची रिकामी काडतुसे जप्त केली आहेत. अफगाणिस्तान युद्ध संपल्यापासून पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून एम-४ चा वापर केला जात आहे. तोच या हल्ल्यामागे कोण आहे, याचा ठोस पुरावा आहे, असे गुप्तचर संस्थेच्या अधिका-याने सांगितले. तपास संस्थेच्या मते चार दहशतवाद्यांपैकी आदिल ठोकर हा स्थानिक होता, असेही यावेळी सांगण्यात आले.

व्हीडीओ ग्राफर बनला
एनआयएचा साक्षीदार
बैसरन येथे जेव्हा अतिरेक्यांनी पर्यटकांवर हल्ला केला, त्यावेळी पर्यटकांच्या रील्स चित्रित करणारा एक स्थानिक फोटोग्राफर एनआयएसाठी मुख्य साक्षीदार म्हणून पुढे आला आहे. विशेष म्हणजे जेव्हा हल्ला झाला, तेव्हा स्वत:चा बचाव करीत पळून जाऊन झाडावर चढला आणि तेथून त्याने अतिरेकी हल्ल्याचा व्हीडीओ चित्रित केला. एनआयएने या व्हीडीओग्राफरची चौकशी केली आहे. या व्हीडीओतून दहशतवाद्यांची ओळख पटवली जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR