कोझिकोड : केरळच्या कोझिकोड जिल्ह्यात अत्यंत धाडसी महिला वन अधिका-याने किंग कोब्राला फक्त ६ मिनिटांत रेस्क्यू करत सर्वांनाच चकित केले. महिला अधिका-याचे धाडस पाहून सर्वानीच सलाम ठोकला आहे. हे काम केवळ धोकादायक नव्हते तर त्यासाठी संयम, आत्मविश्वास आणि अनुभवाचीही आवश्यकता होती.
या बचाव मोहिमेचा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये महिला अधिका-याने काळजीपूर्वक किंग कोब्राला पकडून सुरक्षित ठिकाणी सोडले. व्हीडीओमध्ये स्पष्टपणे दिसून येते की महिला अधिका-याने प्रथम संपूर्ण परिसराची काळजीपूर्वक तपासणी केली, नंतर विशेष उपकरणांच्या मदतीने हळूहळू किंग कोब्राला नियंत्रित केले आणि कोणतीही घाई न करता सुरक्षित ठिकाणी सोडले. किंग कोब्रा हा जगातील सर्वात लांब विषारी साप आहे आणि त्याचा सामना करणे सोपे नाही. हा साप खूप चपळ आणि धोकादायक आहे. तरीही, या महिला अधिका-याने हे बचाव अतिशय शांतपणे आणि निर्भयपणे पूर्ण केले.
घटनेवरून हेही सिद्ध होते की वन्यजीव संवर्धनासारख्या कठीण क्षेत्रातही महिला आता प्रभावी भूमिका बजावत आहेत. वन विभागानेही या महिला अधिका-याच्या शौर्याचे आणि कार्यक्षमतेचे कौतुक केले आहे. ही घटना वन सेवेतील महिलांच्या सहभागाचे आणि नेतृत्व क्षमतेचे एक उत्तम उदाहरण असल्याचे विभागाने म्हटले आहे.