29.4 C
Latur
Wednesday, February 26, 2025
Homeमहाराष्ट्र२२ दिवसांच्या बाळाला विळ्याने दिले ६५ चटके

२२ दिवसांच्या बाळाला विळ्याने दिले ६५ चटके

अमरावती : प्रतिनिधी
अमरावतीचा आदिवासीबहुल भाग असलेल्या मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील सिमोरी गावातील २२ दिवसांच्या बाळाला विळा तापवून ६५ वेळा चटके दिल्याचा धक्कादायक आणि तेवढाच संतापजनक प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. महाराष्ट्राचे समाजमन सुन्न करणारी ही घटना असून यावरून सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

२२ दिवसांचे बाळ आजारी पडल्याने घरगुती उपाय म्हणून त्याच्या पोटाला विळा गरम करून ६५ चटके दिल्याची धक्कादायक घटना मेळघाटातील चिघलदरा तालुक्यात घडली आहे. या प्रकारामुळे बाळाची प्रकृती बिघडल्याने त्याला नातेवाईकांनी सिमोरी गावावरून हातरू प्राथमिक आरोग्य केंद्र येथे दाखल केले. मात्र बाळाची गंभीर प्रकृती पाहता येथून या बाळाला अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयात रेफर केले आहे. सध्या त्याच्यावर अमरावतीच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

बाळाला श्वास घ्यायला त्रास होत होता म्हणून बाळाच्या नातेवाईकाने भोंदूबाबाकडे नेऊन बाळाला गरम चटके दिल्याची माहिती आहे. आता बाळाला श्वास घ्यायला त्रास होत असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे, त्याला नागपूरला देखील रेफर करावे लागेल अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
दरम्यान, चटके देण्याचे प्रकार मेळघाटमध्ये सातत्याने घडताना दिसतात. आम्ही यापूर्वी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने अंधश्रद्धा निर्मूलनाचा मेळघाट मधील २२ गावांत कार्यक्रम राबविला होता, पण अशा प्रकारचे उपक्रम मेळघाटमध्ये राबविण्याची गरज आहे, मात्र शासनाचे उदासीन धोरण यातून आढळून आले, आम्हाला शासनाकडून जसे सहकार्य पाहिजे तसे मिळत नाही, असा आरोप अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने करण्यात आला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR