खरगोन : मध्य प्रदेशातील खरगोन येथे शनिवारी संध्याकाळी २२ वर्षीय तरुणाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. क्रिकेटच्या सामन्यात खेळत असतानाच या तरुणाला हृदयविकाराचा झटका आला होता.
अधिका-यांच्या माहितीनुसार, बलवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कटकूट गावात गोलंदाजी करताना इंदलसिंग जाधव बंजारा यास हृदयविकाराचा झटका आला. बंजारा याला त्वरीत रुग्णालयात नेण्यात आले, परंतु हॉस्पिटलमध्ये पोहोचताच त्याला मृत घोषित करण्यात आले. शवविच्छेदन तपासणीत मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका आढळून आला.
बंजाराला रुग्णालयात नेणा-या साक्षीदारांच्या म्हणण्यानुसार, त्याने सामन्यादरम्यान छातीत दुखत असल्याची तक्रार केली होती. पीटीआयच्या अहवालात शालिग्राम गुर्जर, या स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले की, इंदलसिंग हा बरखड तांडा गाव संघाकडून खेळत होता, ज्याने प्रथम फलंदाजी करताना ७० धावा केल्या. संघ गोलंदाजी करत असताना बंजाराने छातीत दुखत असल्याचेही सांगितले, त्यानंतर त्याने काही वेळ झाडाखाली विश्रांती घेतली. संघाच्या विजयानंतर त्याने आपल्या सहका-यांना जवळच्या रुग्णालयात नेण्यास सांगितले. मात्र हॉस्पिटलमध्ये जात असताना वाटेतच त्याचे निधन झाले.