नवी दिल्ली : दिर्घकाळापासून चर्चेत नसलेल्या कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. देशात कोरोनाचा नवा व्हेरिएंट पसरण्यास सुरुवात झाली. केरळमध्ये झालेल्या एका मृत्यूने टेन्शन वाढले आहे. सूत्रांनुसार, जेएन १ च्या रुग्णांमुळे एका दिवसांत ३ पटीने कोरोना रुग्णसंख्या वाढली आहे. याआधी जेएन १ चे २२ रुग्ण होते ते आता वाढून ६३ इतके झाले आहेत. कोरोना गळयाला संक्रमित करू शकतो असे एका स्टडीने दावा केला आहे. त्यामुळे कोरोनाचा आवाजावर परिणाम होऊ शकतो असे रिपोर्टमध्ये म्हटले आहे.
जीनोम टेस्टिंगमधून कोरोनाच्या एक्सबीबी व्हेरिएंटचे ९० टक्के रुग्ण समोर आलेत. त्यात जेएन १ कमी आहेत. भारतात मागील २४ तासांत कोविड १९ चे ६२८ नवीन रुग्ण आढळले. त्यात उपचारात असलेल्या रुग्णांची संख्या ४ हजार ५४ इतकी झाली आहे. सकाळी ८ च्या आकडेवारीनुसार, मागील २४ तासांत केरळमध्ये संक्रमित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांची संख्या ५ लाख ३३ हजार ३३४ इतकी झालीय. देशात कोरोना रुग्णांमधून बरे होण्याचा दर ९८.८१ टक्के आहे तर मृत्यूदर अवघा १.१९ टक्के आहे. कोविड १९ च्या लसीचे आतापर्यंत २२०.६७ कोटी डोस लोकांना दिले गेले आहेत.
कोरोनाचा नवा जेएन १ व्हेरिएंट आला असला तरी सध्या अतिरिक्त कोरोना लसीची आवश्यकता नाही असे जीनोमिक्स कंसोर्टियमचे प्रमुख डॉ. एनके अरोडा यांनी सांगितले आहे. ते म्हणाले की, विशेष म्हणजे ६० वर्षावरील लोकांना ज्यांना आधीपासूनच आजार आहे, जे इम्युनिटी कमी असल्याने औषधे घेत आहेत त्यांना सतर्कता बाळगायला हवी. कुणीही घाबरण्याचे कारण नाही. केवळ काळजी घेतली पाहिजे.मास्क घाला, सुरक्षित अंतर ठेवा आणि स्वच्छतेवर लक्ष द्या. जर कुठलीही लक्षणे दिसत असतील तर त्वरीत डॉक्टरांशी संपर्क साधा असे आवाहन त्यांनी केले.
डब्ल्यूएचओच्या सूचना
कोरोना व्हायरस सातत्याने त्याचे रुप बदलत आहे. तो जगातील सर्व देशांमध्ये हळूहळू पसरत चालला आहे. सध्या नवीन आलेल्या जेएन १ पासून नागरिकांना धोका कमी आहे. परंतु या व्हायरसवर त्याच्या रचनेत बदल करतोय त्यावर आमचे लक्ष आहे. देशांनी नमुने चाचणीचे डेटा शेअर करावा असे डब्ल्यूएचओने म्हटले आहे. तर दुसरीकडे भारतात वाढणा-या कोरोना रुग्णसंख्येला सध्या जेएन १ नव्हे तर बीबी व्हेरिएंट कारणीभूत आहे. ८०-९० टक्के रुग्ण बीबी व्हेरिएंटचे असून सध्या नमुने चाचणी, जीनोम सिक्वेसिंगने भारतात कोणता व्हायरस चिंताजनक आणि टेन्शन देणारा आहे त्याचा तपास सुरू आहे. बीबी असो जेएन १ या दोन्ही व्हेरिएंटची लक्षणे एकसारखीच आहे. त्यामुळे कोणता व्यक्ती कुठल्या व्हेरिएंटने संक्रमित आहे हे सांगणे कठीण आहे.