37.4 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeसोलापूरविडी कामगारांच्या मुलींना आई प्रतिष्ठानतर्फे सॅनिटरी पॅड

विडी कामगारांच्या मुलींना आई प्रतिष्ठानतर्फे सॅनिटरी पॅड

सोलापूर – आई प्रतिष्ठानतर्फे विडी कामगारांच्या २ हजार ७१ मुलींना सॅनिटरी पॅडचे वाटप करण्यात आले. यावेळी मासिक पाळीतील आरोग्य या विषयावर मुलींना मार्गदर्शनही करण्यात आले.

श्री मार्कंडेय हायस्कूल येथे झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर आई प्रतिष्ठानच्या सृष्टी डांगरे, डॉ. उर्वशी देशमुख, राजश्री कोकणे, पंचाक्षरी स्वामी, तिपण्णा कोळी, मल्लिकार्जुन पाटील उपस्थित होते. आर्थिक अडचणींमुळे कामगारांच्या मुलींना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. हे ओळखून आई प्रतिष्ठानने हजारो विद्यार्थिनींना सॅनिटरी पॅडचे वाटप केले ही बाब कौतुकास्पद आणि समाधानकारक आहे, अशी भावना कामगार पालकांनी यावेळी व्यक्त केली.

आई प्रतिष्ठानतर्फे श्री सिद्धेश्वर कनिष्ठ महाविद्यालय, श्री मार्कंडेय हायस्कूल, साई प्रशाला, जिल्हा परिषद प्राथमिक मुलींची शाळा क्रमांक एक व दोन, श्री सिद्धेश्वर मराठी प्राथमिक शाळा अशा अनेक शाळांमधील विद्यार्थिनींना सॅनिटरी पॅड देण्यात आले. याप्रसंगी डॉ. उर्वशी देशमुख म्हणाल्या, मुलींनी सॅनिटरी पॅडचा वापर करावा. समस्या वाढल्यास आधी पालकांशी आणि नंतर डॉक्टरांशी चर्चा करावी. आवश्यकता भासली तर योग्य उपचार घ्यावा.

संयोजिका सृष्टी डांगरे म्हणाल्या, महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, याबाबतचे प्रबोधन आई प्रतिष्ठान करते. स्त्री ही कुटुंबाचा पर्यायाने समाजाचा आधार असते. हा आधार कणखर राहण्यासाठी स्त्रीचे आरोग्यही चांगले राहणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे मासिक पाळीबाबत विद्यार्थिनींमध्ये जागृती होणे गरजेचे आहे. शिक्षिका अश्विनी पडनूरकर यांनी सूत्रसंचालन केले.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR