कानपूर : वृत्तसंस्था
‘अशी ही बनवाबनवी’ या चित्रपटातील इस्रायली तेलाचा गंमतीदार किस्सा पुन्हा चर्चेत आलेला असताना कानपूरमध्ये ६०-६५ वर्षांच्या व्यक्तीलाही २५ वर्षांच्या तरुणासारखी शक्ती येण्याचे सांगत शेकडो लोकांना ३५ कोटी रुपयांना चुना एका दाम्पत्याने लावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या व्यक्तीने त्याच्या पार्टनरलाही लाखोंचा गंडा घातला आहे.
राजीव कुमार दुबे व त्याची पत्नी रश्मी यांनी ‘रिव्हायवल वर्ल्ड’ नावाने ऑफिस थाटले होते. इस्रायलच्या शास्त्रज्ञांनी शोधलेल्या तंत्रज्ञानाने ऑक्सिजन थेरपीद्वारे ६४ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे बनविण्याची जाहिरात त्यांनी केली. ही मशीनच २५ कोटींची असल्याचे त्यांनी लोकांना सांगितले. २५ वर्षांचे बनविण्यासाठी सहा हजारात १० वेळा आणि ९० हजारात दोन महिने ट्रिटमेंट देण्याचे आमिष दाखविले. याला शेकडो लोक भुलले.
तक्रारदार चंदेल यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार दुबेने त्यांचे १०.७५ लाख रुपये आणि लोकांचे सुमारे ३५ कोटी रुपये लाटले आहेत. हे दोघे परदेशात फरार होण्याची शक्यता आहे. या दोघांनी मशीनद्वारे ट्रिटमेंट देण्यासाठी डॉक्टर, नर्स नोकरीला ठेवण्याचे सांगत चंदेल यांच्याकडून पैसे घेतले होते.