पुणे : बांगलादेशी नागरिकांबाबत पोलिस महासंचालकांनी राज्यभर अलर्ट जारी केला आहे. भाजपच्या सरकारकडून हा विषय प्राधान्याचा करण्यात आला आहे. त्यामुळे सध्या बांगलादेशी नागरिकांचा ठिकठिकाणी शोध घेतला जात आहे.
यासंदर्भात नाशिकच्या पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. त्यासाठी त्यांनी नेहमीचा शिरस्ता न वापरता पोलीस अधिकारी चक्क लेबर सुपरवायझर तर पोलीस कर्मचारी मजूरांचे वेषांतर केले होते. त्यांनी एका मोठ्या बांधकाम साइटवर पाच दिवस रेकी केली. मजुरी केली. पोलिसांनी नाशिक येथील एका साईटवर रेकी करताना चक्क वाळू, विटा आणि बांधकाम साहित्य डोक्यावरून वाहिले.
दिवसभर इतर मजुरांसारखी मेहनत घेऊन अन्य मजूरांचा विश्वास संपादन केला. त्यातून त्यांच्या हाती आठ बांगलादेशी नागरिक असलेले मजूर हाती लागले. ही मोठी कारवाई मानली जाते. यामध्ये पोलिसांना सुमन कलम गाझी, अब्दुल्ला अलीम मंडल, शाहीन मफिजुल मंडल, लासेल नूर अली शंतर, आसाद अर्शद अली मुल्ला, आली सुहान खान मंडल, अल अमीन आमीनुर शेख आणि मोहसीन मौफिजुल मुल्ला या आठ बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेण्यात आले.
हे सर्व कागदपत्रांशिवाय भारतात अनधिकृत वास्तव्य करीत होते. ही कारवाई सध्या राज्यभर चर्चेचा विषय बनली आहे. विशेषत: मालेगाव येथे भाजप नेते किरीट सोमय्या सातत्याने दौरे करून आरोप करीत आहेत. मात्र तेथे एकही बांगलादेशी किंवा रोहिंग्या मुस्लिम सापडलेला नाही. नाशिक पोलिसांच्या परिश्रमाला यश आले. बांगलादेशी नागरिकांचा शोध हा राजकीय विषय न घेता, पोलीस तपासाचा भाग बनवला तर त्यात मोठे यश येईल, अशी चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे यामध्ये पुणे शहरात एक बांगलादेशी एजंट गेली बारा वर्ष काम करीत असल्याचे उघडकीस आले. हा एजंट विविध बांधकाम व्यावसायिकांना मजूर पुरवतो.