33.6 C
Latur
Friday, March 14, 2025
Homeमहाराष्ट्रपिंपरी-चिंचवड येथे अ.भा. म.नाट्य परिषदेचे शंभरावे नाट्य संमेलन

पिंपरी-चिंचवड येथे अ.भा. म.नाट्य परिषदेचे शंभरावे नाट्य संमेलन

पुणे, प्रतिनिधी – अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे शंभरावे ऐतिहासिक नाट्य संमेलन पिंपरी-चिंचवड शहरामध्ये होणार आहे. संमेलनाच्या अध्यक्षपदी चित्रपटनिर्माते डॉ. जब्बार पटेल, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार स्वागताध्यक्ष तर स्वागत समिती अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रमुख निमंत्रक म्हणून उद्योगमंत्री उदय सामंत असतील अशी माहिती अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पिंपरी-चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी पत्रकार परिषदेत सांगितली.

गेल्या २७ वर्षांच्या कालखंडात उदयोन्मुख कलावंतांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी नाट्य संकुल उभे करता आले नाही, ही खंत आहे. नियोजित नाट्य संमेलनाच्या निमित्ताने ही उणीव भरून काढण्यासाठी प्रयत्न करत आहोत. देणगी स्वरूपामध्ये आर्थिक मदत घेऊन शहरात सुसज्ज असे नाट्य संकुल उभे करण्याचा संकल्प पिंपरी-चिंचवड नाट्य परिषदेचा आहे असेही भोईर यांनी सांगितले.

नाट्य संमेलनाच्या निमित्ताने मराठी नाट्य स्पर्धेत गाजलेल्या विविध नाटकांचे प्रयोग प्रायोगिक नाटके, नाट्यछटा, एकपात्री प्रयोग एकांकिका, कीर्तन, लोककला, महाराष्ट्रात गाजलेल्या विविध लावणीसम्राज्ञींचा लावणी महोत्सव, संगीत व नृत्यविषयक कार्यक्रम बालनाट्य व सबंध महाराष्ट्रातील स्पर्धांमध्ये नावाजलेल्या उल्लेखनीय एकांकिका व नाटकांचे प्रयोग होणार आहेत. पिंपरी-चिंचवड शहरांमधील आबाल-वृद्ध रसिकांसाठी ही एक सांस्कृतिक पर्वणी आहे, असे ते म्हणाले.

मुख्य संमेलन मोरया गोसावी क्रीडांगण येथे होणार असून नाट्य दिंडी व शोभायात्रेने संमेलनास सुरुवात होईल. नाट्यदिंडीमध्ये लोककलांचे सादरीकरण केले जाईल. नाट्य क्षेत्रामध्ये कार्यरत नाट्य कलावंतांचा सहभाग यामध्ये असेल. तसेच शहरातील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, ग. दि. माडगूळकर नाट्यगृह, नटसम्राट निळू फुले नाट्यगृह, कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृह, त्याचबरोबर महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्र मैदान भोईर नगर, चिंचवड येथील मैदानावर बालरंगभूमीद्वारे नाट्य सादरीकरणासाठी विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR