नवी दिल्ली : वृत्तसंस्था
जगातील सर्वांत श्रीमंत अब्जाधीश उद्योगपतींची यादी जाहीर करणा-या ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सने जारी केलेल्या यादीत जगातील सर्वात श्रीमंत लोकांना मोठा झटका बसला असून, त्यांच्या संपत्तीत मोठी घट झाली आहे. अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांनी एका दिवसात १५.२ अब्ज डॉलर्सची संपत्ती गमावली. इलॉन मस्कनंतर बेझोस हे दुसरे सर्वांत श्रीमंत उद्योगपती आहेत. भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या संपत्तीतही घट झाली आहे.
जेफ बेझोससह इतर अब्जाधीशांच्या संपत्तीतही प्रचंड घट झाली. ब्लूमबर्गच्या डेटावर नजर टाकली तर टॉप २२ अब्जाधीशांच्या संपत्तीत सातत्याने घट होत आहे. जगातील ५०० सर्वांत श्रीमंत लोकांच्या संपत्तीत १३४ अब्ज डॉलरची घट झाल्याचे निर्देशांकांत उघड झाले आहे. अमेरिकेतील साप्ताहिक बेरोजगारी दराची आकडेवारी कमकुवत झाल्यानंतर भारतासह जगभरातील बाजारपेठांना घसरणीचा सामना करावा लागला.
अमेरिकन शेअर बाजार नासडाक १०० निर्देशांक २.४ टक्क्यांनी घसरला होता. या काळात अमॅझॉनचे शेअर्स देखील ८.८ टक्क्यांनी घसरले. ज्यामुळे जेफ बेझोसची संपत्ती १५.२ बिलियन डॉलरपर्यंत कमी झाली. जेफ बेझोस यावर्षी अमेझॉनचे शेअर्स सतत विकत आहेत. त्यांनी फेब्रुवारीमध्ये नऊ ट्रेडिंग दिवसांत सुमारे ८.५ अब्ज डॉलर किमतीचे शेअर्स विकल्याचे ब्लूमबर्गच्या अहवालात सांगण्यात आले आहे.
जेफ बेझोसचे तिसरे सर्वांत मोठे नुकसान
बेझोसचे एका दिवसातील हे तिसरे सर्वांत मोठे नुकसान आहे. याआधी फक्त ४ एप्रिल २०१९ रोजी मॅकेन्झी बेझोससोबत घटस्फोट झाल्यानंतर त्यांची एकूण संपत्ती ३६ अब्ज डॉलरने घसरली होती. त्यावेळी घटस्फोटाचा समझोता म्हणून मॅकेन्झीने जेफ बेझोसच्या सुमारे २५ टक्के हिस्सेदारी आपल्या नावावर केली होती. त्यानंतर २९ एप्रिल २०२२ रोजी अमॅझॉनचे शेअर्स १४ टक्क्यांनी घसरून १२४.२८ बिलियन डॉलर झाले आहे. त्या दिवशी जेफ बेझोस यांना दुस-यांदा सर्वांत मोठा तोटा सहन करावा लागला.
५०० श्रीमंतांना १३४ अब्ज डॉलर्सचा फटका
जगातील ५०० श्रीमंत लोकांच्या संपत्तीचा समावेश केल्यास १३४ अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले आहे. जागतिक बाजारातील घसरणीमुळे इलॉन मस्क आणि जगातील तिसरे सर्वात श्रीमंत फ्रेंच अब्जाधीश बर्नार्ड अरनॉल्टसारख्या इतर अब्जाधीशांच्या संपत्तीतही अनुक्रमे ६.५७ अब्ज डॉलर आणि १.२१ अब्ज डॉलरची घट झाली आहे. जगातील चौथे सर्वांत श्रीमंत उद्योगपती आणि मेटाचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांची संपत्ती ३.३९ अब्ज डॉलरने घटून १७४ अब्ज डॉलर झाली तर पाचवे सर्वांत श्रीमंत उद्योगपती आणि मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांची संपत्ती ३.३९ अब्ज डॉलरने कमी झाली.
अदानी-अंबानी यांचेही नुकसान
ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकात आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती आणि जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांना या कालावधीत १.२० अब्ज डॉलरचा तोटा झाला. त्यांची एकूण संपत्ती ११३ अब्ज डॉलर इतकी घसरली. रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्यानंतर १२ व्या क्रमांकाचे श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी यांची संपत्ती १.३४ अब्ज डॉलरने कमी होऊन ११० अब्ज डॉलरवर आली.