अकोला : प्रतिनिधी
गेल्या आठ दिवसांत तुरीच्या कमाल भावात मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याचे पाहायला मिळाले आहे. बाजारात दाखल झालेल्या नव्या तुरीच्या दरात थेट १६६० रुपयांनी घसरण झाली. तर गेल्या आठ दिवसांत तुरीचे दर सतत घसरले आहेत.
अकोल्याच्या कृषि उत्पन्न बाजार समितीत सध्या तुरीला ८०८५ रुपये इतका कमाल भाव मिळतोय. तर सरासरी भाव हा ८ हजार रुपयांच्या जवळपास आहे. मागील आठ दिवसांत नव्या तुरीच्या दरात १६०० रुपयांची घसरण झाल्याने आवकही घटली आहे. त्यामुळे या हंगामात देखील शेतकरी भाववाढीच्या प्रतीक्षेत तूर घरात साठवून ठेवण्याची दाट शक्यता आहे.
विशेष म्हणजे पुढच्या आठवड्यामध्ये तुरीची आवक वाढण्याची शक्यता कृषि बाजार समितीने व्यक्त केली आहे. सध्या तुरीला प्रति क्विंटल सरासरी भाव ७९०० रुपये प्रति क्विंटल मिळतो आहे.
राज्यात काही ठिकाणी हमीभावाप्रमाणे सोयाबीन खरेदीची केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. तरी सर्व बाजार समित्यांवर ही केंद्रे नसल्यामुळे शेतक-यांना हमीभाव केंद्रावर सोयाबीन वाहून नेण्यासाठी मोठा खर्च होत आहे. वाहतुकीचा खर्च न परवडल्यामुळे शेतकरी आपले सोयाबीन खासगी व्यापा-यांना ४००० रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे विकत आहेत. राज्य व केंद्र सरकारने या पार्श्वभूमीवर तातडीने हस्तक्षेप करून राज्यभरातील सर्व बाजार समित्यांमध्ये सरकारी हमीभाव खरेदी केंद्रे सुरू करून शेतक-यांना ताबडतोब दिलासा द्यावा अशी मागणी किसान सभेच्या वतीने करण्यात आली आहे.
राज्यात सोयाबीनला हमीभाव द्यावा, अशी मागणी शेतक-यांकडून केली जात आहे. हीच बाब लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका भाषणात ‘सोयाबीन उत्पादक शेतक-यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी सोयाबीनला किमान आधारभूत किंमत सहा हजार रुपये प्रति क्विंटल देण्यात येईल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. मात्र, तेवढा दर मिळत नाही. याच मुद्यावरून किसान सभेने टीका केली आहे.