बीड : प्रतिनिधी
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडमधील गन कल्चर समोर आणताना सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी तसेच सुरेश धस यांनी गंभीर आरोप करत जिल्ह्यात हवेत गोळीबार करून दहशत निर्माण करणा-यांचा फोटो आणि व्हिडिओ समोर आणले होते. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारवाईचे आदेश दिले. त्यानंतर जिल्ह्यात १०० जणांचा शस्त्र परवाना रद्द करण्यात आला असून, त्यामध्ये कुख्यात खंडणीखोर वाल्मिक कराडचाही शस्त्र परवाना रद्द करण्यात आला.
गंभीर स्वरूपाचे गुन्हे असतानाही बीड जिल्ह्यातील अनेक जणांकडे पिस्तूल परवाने होते. यापैकी ३०० पिस्तूल परवाने रद्द करण्यात आले आहेत. खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपी वाल्मिक कराडचा पिस्तूल परवाना रद्द करण्यात आला आहे. वाल्मिक कराडवर एकूण १४ गुन्हे होते, त्या गुन्ह्यांपैकी १० गुन्हे निकाली निघाले असले तरी चार गुन्हे न्यायप्रविष्ठ आहेत. वाल्मिक कराडने १९९६ मध्ये पिस्तूल परवाना मिळवला होता. तो आता रद्द करण्यात आला आहे.
पवनचक्की खंडणी प्रकरणातील आणि संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील सर्वच आरोपींवर मोका लावण्यात आला आहे. मात्र, यामधून वाल्मिक कराडचा समावेश करण्यात आलेला नाही. वाल्मिक कराडवर अजूनही खंडणी प्रकरणातील आरोप सिद्ध झाला नसल्याने त्याच्यावर कारवाई सध्याला टळली गेल्याचे बोलले जात आहे. या कारवाईनंतर आता काही तासांमध्येच वाल्मिक कराडचा शस्त्र परवाना रद्द करण्यात आला.