पुणे : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे पुण्याचे महागनगरप्रमुख रविंद्र धंगेकर गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. त्यांनी पुण्याच्या जैन बोर्डिंगच्या जागेच्या व्यवहाराचा मुद्दा उचलून धरला आहे. या प्रकरणात पुण्याचे भाजपचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर आरोप केले आहेत. भगवान महावीरांचे मंदिर आणि जैन बोर्डींगची जागा लुटण्याचा व्यवहार रद्द होऊन भगवान महावीरांच्या मूर्तीवरील कर्जाचा बोजा चढविणा-या व्यक्ती विरोधात कारवाई होत नाही, तोपर्यंत माझा हा लढा सुरूच राहील असेही त्यांनी एक्स पोस्टच्या माध्यमातून सांगितले आहे.
त्यानंतर धंगेकर मुरलीधर मोहोळ यांना टार्गेट करून वारंवार ट्विट करताना दिसून येत आहेत. पुणे महानगरपालिकेत महापौर हे संविधानिक पद सांभाळत असताना एका खाजगी व्यावसायिकाचे वाहन वापरणे हे महापौरांच्या नीतिमत्तेला धरून आहे का? असा सवाल त्यांनी एक्स पोस्टच्या माध्यमातून उपस्थित केला आहे. मी आपणास काही माहिती देऊ इच्छितो, मोहोळ हे खासदार होण्याच्या अगोदर पुणे नगरीचे महापौर होते. हे महापौर असताना पुणे महानगरपालिकेची अधिकृत शासकीय पाटी लावून महापौर पांढ-या रंगाची इनोव्हा क्रिस्टा वापरायचे.
त्या गाडीचा नंबर होता एमएच १२ एसडब्ल्यू ०९०९ ही गाडी ना मोहोळ यांची होती ना पुणे महानगरपालिकेचे शासकीय वाहन. ही गाडी होती कोथरूडच्या बढेकर बिल्डरची. हे तेच बिल्डर आहे ज्यांनी जैन होस्टेल खरेदी करण्यासाठी दोन नंबरचा लिलाव लावला आणि हे देखील पुन्हा मुरलीधर मोहोळ यांचे पार्टनर असल्याचा आरोप धंगेकर यांनी केला आहे. त्यावरून मुरलीधर मोहोळ यांनी धंगेकरांना चॅलेंज केले आहे. पुण्यात त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
मोहोळ म्हणाले, रोज सकाळी तुम्ही तिथे जाता, बोगस ट्विट करतात ते आणि तुम्ही दाखवता. प्रत्येक गोष्टीचा त्यांच्याकडून पुरावा मागितला पाहिजे. महापालिकेची गाडी मी वापरली नाही, लोकसभा निवडणुकीत मध्ये मी दिलं आहे की, मी स्वत:ची गाडी वापरली. पुण्याला एक महापौर असा मिळाला स्वत:ची गाडी वापरणारा आहे. हा बोगस कार्यक्रम चालला आहे. त्याचा, कागद दाखवा आणि बातमी दाखवा. मला या माणसाबद्दल काही बोलायचे नाही. २०११ मध्ये जमीन हडपली म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे. १० गुन्हे त्यांच्यावर दखल आहेत माझ्यावर एकही नाही. त्यांना काय काम धंदा नसल्याचे मोहोळ यांनी सांगितले आहे.

