परळी : प्रतिनिधी
परळीत राज्य शासनाचा शासन आपल्या दारी कार्यक्रम आज पार पडला. तीन राज्यांत भाजपला मिळालेले यश आणि राज्यात भाजप-शिवसेना-राष्ट्रवादीचे ट्रिपल इंजिन सरकार यामुळे सत्ताधारी महायुतीचा आत्मविश्वास दुणावला असून, याचीच प्रचिती आजच्या कार्यक्रमात आली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आतापर्यंत राज्यात झालेल्या २० शासन आपल्या दारी कार्यक्रमात परळीत रेकॉर्डब्रेक गर्दी पाहायला मिळाली.
त्यामुळे हा कार्यक्रम सर्वांत यशस्वी ठरल्याचा दावा केला. यावेळी सर्वच नेत्यांनी सरकारच्या कामकाजाचा आढावा घेत विरोधकांवर हल्लाबोल केला. मात्र, यात सर्वांत मोठे आकर्षण माजी मंत्री पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकाच व्यासपीठावर येण्याचे होते. त्यामुळे सभेला गर्दी जमली होती.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषी मंत्री धनंजय मुंडे, माजी मंत्री पंकजा मुंडे आदी उपस्थित होते.
तत्पूर्वी मुख्यमंत्र्यांसह सर्वच नेत्यांनी गोपीनाथ गडावर जाऊन गोपीनाथ मुंडे यांच्या समाधाचे दर्शन घेतले. त्यावेळी तेथे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यात गळाभेट झाली. त्यानंतर सर्वांनी मिळून वैद्यनाथाचेही दर्शन घेतले. त्यानंतर या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी तब्बल १ कोटी ८४ लाख लोकांनी शासन आपल्या दारी योजनेचा लाभ घेतल्याचा दावा केला. याप्रसंगी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सर्वांनी लक्ष्य केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जे अडीच वर्ष घरात बसले त्यांना शासन आपल्या दारी कार्यक्रम काय समजणार, असा सवाल करीत आता त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, असे म्हटले, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना तुम्हाला शेजारच्या घरात कुणी विचारत नाही, आम्हाला शेजारच्या राज्यात प्रचारासाठी बोलवतात, असा टोला लगावला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री धनंजय मुंडे, माजी मंत्री पंकजा मुंडे यांचीही भाषणे झाली.
शेतक-यांना १२ तास दिवसा वीज मिळणार
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढच्या वर्षात सर्व शेतक-यांना दिवसा १२ तास वीज दिली जाणार आहे, असे सांगत शेतक-यांना मागच्या अनेक वर्षांपासून दिवसा अर्धी, रात्री अर्धी वीज मिळत आहे. त्यामुळे शेतक-यांना अनंत अडचणीचा सामना करावा लागत आहे. मात्र, पुढील वर्षापासून ३६५ दिवस दिवसा वीज दिली जाईल, असे म्हटले.
विकासासाठी कोणत्याही मंचावर जाण्याची तयारी
परळीच्या विकासासाठी माझी कोणत्याही मंचावर जाण्याची तयारी असल्याचे वक्तव्य भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केले. माझ्या राजकीय जीवनामध्ये मी कधीही जात, धर्म, पक्ष बघितला नाही. कोणताही द्वेष मनात ठेवला नाही. कारण तुमचे कर्ज आमच्या डोक्यावर आहे. ते ऋण फेडण्याचे काम आम्ही करत असल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या.
नाराजी कायम?
माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी शासन आपल्या दारी कार्यक्रमाला हजेरी लावली. परंतु आज त्यांनी आपल्या आवेशात भाषण केले नाही, तर सावध पवित्रा घेत खासदार प्रीतम मुंडे संसदेच्या अधिवेशनासाठी दिल्लीत असल्याने आपण त्यांचे प्रतिनिधी म्हणून आणि परळीची कन्या म्हणून मी उपस्थित असल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांची नाराजी कायम आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.