14.9 C
Latur
Saturday, November 15, 2025
Homeमहाराष्ट्रराज्यात तब्बल ८ पक्षांची व्यापक महाआघाडी

राज्यात तब्बल ८ पक्षांची व्यापक महाआघाडी

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक बदलापूर पॅटर्न ऐतिहासिक ठरणार

मुंबई : राज्य निवडणूक आयोगाकडून नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा होताच संपूर्ण महाराष्ट्रात राजकीय हालचाली वेगवान झाल्या आहेत. २ डिसेंबरला मतदान आणि ३ डिसेंबरला मतमोजणी असल्याने सर्व पक्षांनी आपली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.

बदलापुरातील या ऐतिहासिक युतीची औपचारिक घोषणा महाविकास आघाडीकडून झालेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आली. शिवसेना (ठाकरे), काँग्रेस, राष्ट्रवादी(शरद पवार), मनसे, वंचित बहुजन आघाडी, बहुजन मुक्ती पार्टी, आम आदमी पार्टी आणि आरपीआय (आर. के. गट) असे आठ पक्ष एकत्र येत २४ पैकी २२ प्रभागांमध्ये जागावाटप निश्चित करण्यात आले आहे. स्थानिक नेतृत्वाने दिलेल्या माहितीनुसार, नगराध्यक्षपदासाठी शिवसेना ठाकरे गटाची प्रिया गवळी आणि मनसेची संगीता चेंदवणकर अशी दोन नावे वरिष्ठांकडे पाठवण्यात आली असून अंतिम निर्णय लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. या घोषणेनंतर बदलापुरातील निवडणूक अधिकच चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख १७ नोव्हेंबर असल्याने सर्व पक्षांचा वेग वाढला आहे. शिवसेना-भाजपच्या महायुतीने अद्याप आपल्या उमेदवारांची घोषणा केलेली नसली तरी महाविकास आघाडीकडून आठ पक्षांमध्ये ४५ जागांचे वाटप करून तयारी पूर्ण करण्यात आली आहे. या वाटपात शिवसेना ठाकरे गट आणि बहुजन मुक्ती पक्षाला प्रत्येकी ११ जागा देण्यात आल्या आहेत. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला ६, काँग्रेसला ५, मनसेला ३ तर वंचित बहुजन आघाडीला ५ जागा देण्यात आल्या आहेत. आम आदमी पार्टीला २ आणि आरपीआय आर. के. गटाला १ जागा मिळाली आहे. बहुजन मुक्ती पक्षाला स्वत:चे चिन्ह नसतानाही ११ जागा मिळाल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

मतदारांच्या एकत्रीकरणाचा फायदा
या जागावाटपावर स्थानिक राजकारणात मिश्र प्रतिक्रिया दिसत आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीपेक्षाही दुप्पट जागा बहुजन मुक्ती पक्षाला देण्यात आल्याने ही युती बदलापुरातील दलित आणि बहुजन मते एकत्र आणण्याचा प्रयत्न असल्याचे काही राजकीय निरीक्षक म्हणतात. तर काहीजणांच्या मते या जागावाटपामुळे महायुक्तीला मोकळे रान मिळू शकते. मविआतील नेत्यांनी मात्र आरोप फेटाळून लावत हे वाटप पूर्णत: स्थानिक ताकद आणि संघटनशक्ती पाहून करण्यात आल्याचे सांगितले आहे. या युतीमुळे बहुजन, अल्पसंख्याक आणि पारंपरिक आघाडी मतदारांच्या एकत्रीकरणाचा फायदा होईल असा विश्वास या आघाडीच्या पदाधिका-यांनी व्यक्त केला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR