जालना : प्रतिनिधी
मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांनी आज विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेतला असून, त्यांनी अखेर निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची भूमिका घेतली आहे. जिथे आपले उमेदवार निवडून येतील, तिथे उमेदवार उभा करण्यात येईल आणि इतर ठिकाणी मराठा आरक्षणाला विरोध असणा-यांना पाडण्याची भूमिका घ्यायची, अशी घोषणा आज केली. तसेच एससी-एसटी आरक्षण असलेल्या ठिकाणी उमेदवार द्यायचे नाहीत. मात्र, तिथे आपल्या भूमिकेला पाठिंबा असणा-यांच्या मागे उभे राहायचे, असेही जरांगे पाटील म्हणाले.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निर्णय घेण्यासाठी आज मनोज जरांगे पाटील यांनी बैठक बोलावली होती. या बैठकीत त्यांनी हा निर्णय जाहीर केला. ते म्हणाले की, आमचे लक्ष्य पक्क आहे आणि त्या लक्ष्याचा वेध आम्ही घेतला आहे. आम्हाला संपवण्यास निघालेल्यांना आम्ही संपवणार म्हणजे संपवणार, असा थेट इशारा यावेळी सरकारला दिला.
आमच्या समाजील गोरगरिब लेकरांची सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील संधी हिरावून घेतली. आता हिशेबच होणार आहे. आमच्या हाता-तोंडाला आलेला घास सरकारने काढून घेतला. आमचा हातही छटला आणि घासही काढला. सुडबुद्धीने आम्हाला मिळत असलेले आरक्षण काढून घेतले, असे म्हणत जरांगे पाटलांनी सरकारवर हल्लाबोल केला.
सरकारने मराठ्यांना काहीच दिले नाही
निवडणुका घोषित होण्याअगोदर शेवटी जाता- जाता आमच्या नाकावर टिच्चून ओबीसींच्या काही जाती आरक्षणात घातल्या. परंतु मराठ्यांना काही दिले नाही. मराठ्यांचे पोरं मोठे होऊ नये या भूमिकेतून सरकार विशेषत: देवेंद्र फडणवीस उतरले. आता त्यांची वाट लावल्याशिवाय आम्ही सोडणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.