जळगाव : भरधाव चारचाकी झाडावर आदळून तीन तरुण जागी ठार झाले. ही भीषण घटना सावदा – रावेर मार्गावर शुक्रवारी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत तीन तरुण ठार झाले आहेत तर तीन जण गंभीर जखमी आहेत.
हा अपघात एवढा भीषण होता की होंडा सिटी कारचा अक्षरश: चक्काचूर झाला. जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील सावदा गावाजवळ गुरुवारी मध्यरात्रीनंतर हा अपघात घडला. मिळालेली माहिती अशी, अपघातात ठार झालेले तिघे तरुण हे जळगाव जिल्ह्यातील रावेरचे रहिवासी होते. शुभम सोनार, मुकेश रायपूरकर आणि जयेश सोनार अशी त्यांची नावे आहेत. या अपघातात अन्य तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे सर्वजण भुसावळ येथे हळदीच्या कार्यक्रमासाठी गेलेले होते. कार्यक्रम आटोपून घरी परत येत असताना सावदा गावाजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने त्यांची भरधाव कार झाडावर आदळली. जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या अपघातात गणेश भोई, अक्षय उन्हाळे व विकी जाधव हे गंभीर जखमी झाले आहेत. अपघातात होंडा सिटी कार अक्षरश: चक्काचूर झाली. कार भरधाव वेगात झाडावर आदळल्याने तिचे इंजिन अपघात स्थळापासून वीस फूट अंतरावर पडलेले दिसून येत आहे. तसेच कारची पुढची दोन्ही चाकेदेखील निखळून बाजूला पडलेली आहेत. या अपघातात ठार झालेला मुकेश रायपुरकर याचा गुरुवारी वाढदिवस होता. वाढदिवस साजरा केल्यानंतर काही तासातच त्याचा अपघातात मृत्यू झाला आहे.
या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर रावेर शहरातील नागरिकांनी रात्रीच घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य सुरू केले. तीन कुटुंबातील तरुण मुलांचा अपघातात मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.