मुंबई : प्रतिनिधी
राज्यातल्या अनेक भागात पुरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. अशात बारावीची आज परीक्षा आहे. याच पार्श्वभूमीवर शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी मोठा निर्णय घेतला आहे. विद्यार्थी उशिरा पोहोचले तरी त्यांना परीक्षेला बसता येणार आहे. याशिवाय आज ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा देता येणार नाही, त्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी दिली जाईल, असे केसरकरांनी जाहीर केले आहे.
रायगड, ठाणे, पुण्यात शाळांना सुटी देण्यात आली आहे. मुंबईच्या शाळेबाबत पालिका आयुक्त निर्णय घेत असतात. पाणी जास्त साचले तरी तसा निर्णय घेतला जाईल, असे केसरकरांनी स्पष्ट केले आहे.
काही विद्यार्थ्यांची परीक्षा असल्याने पावसामुळे त्यांना मनस्ताप सहन करावा लागत होता. अनेकांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यास अडचण येत होती. अनेकजण उशिरा परीक्षा केंद्रावर पोहोचण्याची शक्यता होती. याची दखल शिक्षणमंत्र्यांकडून घेण्यात आली आहे. त्यांनी उशिरा येणा-या विद्यार्थ्यांना देखील परीक्षा केंद्रात बसू देण्याची सवलत दिली आहे. तसेच जे परीक्षा देऊ शकले नाहीत त्यांना एक संधी दिली जाईल.